फेसबूकवर बनावट अकाऊंट तयार करुन त्या माध्यमातून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून एका व्यावसायिकाला लुटण्याचा प्रयत्न पुण्यात करण्यात आला आहे. त्यासाठी आरोपीने गोळीबारही केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पुणे-मुंबई महामार्गावर हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी हरिओम मेहरसिंग (वय ३०, रा. सुतारवाडी पाषाण, मूळ राजस्थान) यांच्यावर पुणे-मुंबई महामार्गावर गोळीबार करण्यात आला होता. यात ते गंभीर जखमी झाले होते. याच घटनेचा तपास वाकड पोलिसांनी केला आणि काही तासात उलगडा करत आरोपीना जेरबंद केले. यातील आरोपींनी नंदिनी मोहोळ नावाचे बनावट फेसबूक अकाउंट तयार करून त्यावर दाक्षिणात्य अभिनेत्रींचे फोटो पोस्ट केले. आरोपींनी व्यवसायिक मेहरसिंग यांची हेरगिरी केली आणि त्यांना जाळ्यात ओढायचे ठरवले त्याप्रमाणे त्यांनी व्यवसायिक हरिओम यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. एक महिनाभर त्यांनी चॅटिंग सुरू ठेवले जेणेकरून त्यांना संशय येणार नाही. ते राजस्थान येथे असल्याचे चॅटिंगद्वारे माहिती काढली. व्यावसायिक मेहरसिंग हे अॅडमिशनद्वारे भरपूर पैसे कमावत होते, अशी माहिती आरोपीना मिळाली होती.

किरण काळे (वय २५), रोहित देवळे (वय २०), अक्षय गोडंबे (वय २४, तिघेही रा. कोथरूड, पुणे) आणि अभिलाष मोहोळ (वय २५, रा. मुळशी) अशी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. यातील आरोपी किरण आणि अभिलाष हे उच्चशिक्षित आहेत. अद्याप दोन आरोपींचा शोध वाकड पोलीस घेत आहेत. गोळीबाराची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील काही आरोपी उच्चशिक्षित असून दोन सराईत गुन्हेगार आहेत. तर दोन आरोपींचा शोध वाकड पोलीस घेत आहेत.