News Flash

राज्यसेवा परीक्षेत नगरचा अतुल कानडे अव्वल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत नगर येथील अतुल कानडे हा उमेदवार राज्यात पहिला आला आहे,

राज्यसेवा परीक्षेत नगरचा अतुल कानडे अव्वल
नगरचा अतुल कानडे व पुण्याची रोहिणी नऱ्हे

मुलींमध्ये पुण्याची रोहिणी नऱ्हे प्रथम; ग्रामीण भागांतील उमेदवारांचे प्रमाण वाढते
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत नगर येथील अतुल कानडे हा उमेदवार राज्यात पहिला आला आहे, तर पुणे जिल्ह्य़ातील शिरूर येथील रोहिणी नऱ्हे ही मुलींमध्ये पहिली आली आहे. यावर्षीही अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांची सरशी दिसत असून ग्रामीण भागांतील उमेदवारांचे प्रमाणही वाढले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या २०१५ च्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल मंगळवारी रात्री उशिरा जाहीर झाला. या परीक्षेत राज्यात आणि मागासवर्गीय उमेदवारांत नगर येथील अतुल अनिल कानडे हा उमेदवार ४३९ गुण मिळवून पहिला आला आहे. राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक या पदासाठी त्याची निवड झाली आहे. अतुल याने संगणकात अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले आहे.
राज्यात मुलींमध्ये पुणे जिल्ह्य़ातील शिरूर येथील रोहिणी दत्तात्रय नऱ्हे पहिली आली असून तिला ३९६ गुण मिळाले आहेत. ‘ब’ गटातील नायब तहसीलदार पदासाठी तिची निवड झाली आहे.
आयोगाचे संकेतस्थळ सुरू होण्यात मंगळवारी अडचणी आल्यामुळे अनेक उमेदवार निकाल पाहू शकले नव्हते. संकेतस्थळ सुरू होण्यातील अडचणी बुधवारीही कायम राहिल्या.
या परीक्षेसाठी एकूण ३६८ पदे होती. त्यातील ७२ पदे ही ‘अ’ दर्जाची तर २९६ पदे ही ‘ब’ दर्जाची होती. राज्यातील १ लाख ७० हजार २३७ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यातील ४ हजार ७२२ उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड झाली होती. त्यातून १ हजार १३८ उमेदवार मुलाखतीसाठी निवडण्यात आले होते.
या वेळी १०८ महिला उमेदवारांची आणि सहा अपंग उमेदवारांची विविध पदांसाठी आयोगाने शिफारस केली आहे.
पुणे : ग्रामीण आणि निमशहरी भागातील उमेदवारांनी निकालात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. मुंबई, पुणे या शहरांपेक्षा ग्रामीण भागातील किंवा निमशहरी भागातील उमेदवारांचे प्रमाण अधिक आहे.
गेल्या काही वर्षांपासून मराठवाडय़ातील उमेदवारांचे प्रमाण हे स्पर्धा परीक्षांमध्ये सर्वाधिक आहे. शहरी भागातील विद्यार्थ्यांचा ओढा खासगी क्षेत्राकडे अधिक असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांकडून नोंदवले जात आहे.
उस्मानाबाद, बीड, लातूर, कोल्हापूर, सांगली या अशा निमशहरी भागातील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रमाणे वाढले आहे. त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांच्या निकालात अभियांत्रिकी, वैद्यकीय अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उमेदवारांची मक्तेदारी दिसून येत आहे. या निकालातही ती कायम राहिली. उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये नव्या उमेदवारांची संख्या वाढली. मात्र, वरच्या पदांवर अनुभव असलेल्या उमेदवारांचीच सरशी झाल्याचे दिसत आहे. निवडलेल्या उमेदवारांपैकी साधारण ३० टक्के उमेदवार हे आधीपासून कोणत्या तरी पदावर काम करत असल्याचे दिसत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण या वर्षीही अधिक दिसत आहे.

कट ऑफ घसरले
गेल्या वर्षी राज्यसेवा परीक्षेचे कट ऑफ वाढले होते. या वर्षी मात्र सर्वच पदांच्या कट ऑफ मध्ये घसरण दिसून आली आहे. ४ ते ५ गुणांची घसरण दिसत आहे. पहिल्या आलेल्या उमेदवाराचे गुणही गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाले आहेत.
या वर्षी मुलाखतींसाठी सढळ हाताने गुण दिलेले दिसत नसल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

अनुशेषाची पदे भरल्यामुळे गुणानुक्रमानुसार पदे नाहीत
पहिल्या आलेल्या उमेदवाराला पोलीस अधीक्षक पदही नाही
पुणे : राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात अनुशेषाची पदे भरल्यामुळे या वर्षी गुणानुक्रमानुसार उमेदवारांना पदे मिळू शकलेली नाहीत. राज्यात पहिल्या आलेल्या महिलेलाही ‘ब’ गटातील नायब तहसीलदार पद मिळाले आहे, तर राज्यात पहिल्या आलेल्या उमेदवाराला उपजिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक पद मिळू शकलेले नाही.
राज्यसेवा परीक्षेत पहिला आलेल्या उमेदवारांची निवड ही सर्वसाधारणपणे उपजिल्हाधिकारी पदासाठी होते. मात्र या वेळी राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून विविध पदांवरील आरक्षित जागांचा अनुशेष भरून काढण्यात आला आहे. त्यामुळे गुण जास्त दिसत असले, तरी प्रत्यक्षात अनेक उमेदवारांना वरील पदे मिळू शकलेली नाहीत. त्यामुळे पहिला आलेला उमेदवार म्हणजे उपजिल्हाधिकारी असा शिरस्ता मोडीत काढत पहिल्या उमेदवाराची राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक पदी निवड झाली आहे.
राज्यात महिलांमध्ये पहिल्या आलेल्या उमेदवाराला ‘अ’ दर्जाचे पदही मिळू शकलेले नाही. प्रथम क्रमांकाचे स्थान मिळूनही या उमेदवाराला ‘ब’ दर्जाच्या नायब तहसीलदार पदी समाधान मानावे लागले आहे.
यावर्षी उपजिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक ही पदे राखीव गटांसाठी होती. खुल्या गटासाठी आणि इतर मागासवर्गीय गटासाठी सहायक संचालक वित्त सेवा, गट विकास अधिकारी, तहसीलदार या पदांवरील जागा होत्या.
राज्यसेवा पुढील परीक्षेची पूर्वपरीक्षा ही १० एप्रिलला होत आहे. त्यासाठी खुल्या गटातील जागा तुलनेने जास्त आहेत. त्यामुळे पुढील परीक्षेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे या वेळी संधी मिळू न शकलेल्या उमेदवारांनी सांगितले.

यूपीएससी हेच लक्ष्य!
राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (एमपीएससी) राज्यात पहिला येऊ, असे मुळीच वाटत नव्हते. मात्र हे यश मिळाल्यामुळे आत्मविश्वास चांगलाच वाढला असून, माझे लक्ष्य केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा हेच आहे, तेही आता सोपे होईल, असा विश्वास अतुल कानडे याने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला.
प्रशासकीय सेवेतच काम करायचे होते
मी मुळातली शिरूरची आहे. तंत्रज्ञान शाखेतील पदवी (बी.टेक) घेतल्यानंतर मी सहा वर्षे खासगी कंपनीत नोकरी करत होते. खासगी क्षेत्रातील नोकरीपेक्षा प्रशासनात सहभागी होऊन समाजासाठी काही करण्याची संधी मिळते, या जाणिवेतून नोकरी करीत असतानाच स्पर्धा परीक्षांची तयारी करू लागले. आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारीही सुरू आहे, असे मुलींमध्ये प्रथम आलेल्या रोहिणी नऱ्हे हिने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2016 3:38 am

Web Title: atul kanade from ahmednagar tops mpsc exam
टॅग : Mpsc Exam
Next Stories
1 निवृत्त पोलीस निरीक्षक आंधळकर यांना सतीश शेट्टी खून प्रकरणी अटक
2 प्रवाशांच्या उन्हाळी लूटमारीसाठी खासगी वाहतूकदारांची तयारी सुरू
3 छत्रपती संभाजीमहाराज यांचे ‘शिवतेज संभाजी’ चरित्र त्रिमितीय चित्ररूपात
Just Now!
X