चिन्मय पाटणकर chinmay.reporter@gmail.com

लेखक, समीक्षक, माधव आचवल यांच्या ‘किमया’ या पुस्तकातील निवडक मजकुराच्या अभिवाचनाचा कार्यक्रम ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे सादर करत आहेत. पुण्यात त्याचे प्रयोग २७ ते ३० नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत. या निमित्ताने अभिवाचनाच्या अनुषंगाने त्यांच्याशी साधलेला संवाद..

sanjay raut
“मी त्याचक्षणी राजकारणासह पत्रकारिता सोडेन”, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; ठाकरेंचे खासदार नेमकं काय म्हणाले?
Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
Sharad pawar on loksatta agralekh
“मी फक्त लोकसत्ताचा अग्रलेख वाचला”, अजित पवारांच्या ‘त्या’ पत्रावरून शरद पवारांचा खोचक टोला, काय लिहिलंय अग्रलेखात?
Razmanama Mahabharata in Persian language
महाभारत संस्कृतातून फारसीत; अकबराच्या साहित्यिक आविष्काराबद्दल तुम्हाला माहितेय का?

*  जयंत पवार यांची कथा ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य’ आणि चंद्रशेखर फणसळकर लिखित ‘परवा आमचा पोपट वारला’ या दोन अभिवाचनानंतर आता तुम्ही माधव आचवल यांच्या ‘किमया’चं अभिवाचन सादर करत आहात. तुम्हाला अभिवाचनावर भर द्यावा असं का वाटलं?

– पूर्वी मी नियमितपणे अभिवाचन करायचो. ‘डायरीची दहा पाने’ या अभिवाचनाचे तीस- चाळीस प्रयोग केले होते. कवी अरुण कोलटकर असताना त्यांच्या कवितांचं वाचन केलं होतं. भालचंद्र नेमाडे यांच्या ‘कोसला’ कादंबरीचं आकाशवाणीसाठी अभिवाचन केलं होतं. ते बरंच गाजलं होतं. मला स्वत:ला कथा, कविता, कादंबरी वाचायला आवडतात. त्यात एक प्रकारे नाटय़ असतं. माझं भाषेवर प्रेम आहे. अनेक जण वाचन करतात, पण मला अर्थवाचन करायला आवडतं. साहित्यप्रकारांतून लेखनातील वेगवेगळे घाट, आकृतिबंध समजून घेता येतात. मला वेगवेगळय़ा साहित्यप्रकारांना हात लावून पाहायला आवडतं. ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य’ या अभिवाचनाच्या जोडीनं प्रकाशयोजना, संगीतामध्ये काही प्रयोग करून पाहिले होते. अभिवाचन हे नाटकाला पर्याय म्हणून करत नाही, तर तो स्वतंत्र कलाप्रकार आहे. कथेचा आशय किंवा कथा नाटकातून मांडता येत नाही. मग ते प्रयोग अभिवाचनातून करता येतात. ध्वनी या प्रकारावर काम करून पाहता येतं. शब्द, त्याचं उच्चारण, त्यातून उमटणारा नाद, त्यांचा अर्थ शोधणं हे सगळं करून बघता येतं. म्हणूनच अभिवाचन हे माझ्यासाठी ‘आंतरपीक पालट’ आहे.

*  तंत्रज्ञानाच्या गदारोळात वाचन कमी झाल्याची अशी ओरड केली जाते. अभिवाचनामुळे साहित्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, लोक वाचनाकडे वळण्यासाठी उपयुक्त ठरतं का?

– माधव आचवल हे वास्तुरचनाकार होते. त्यांनी १९६१ मध्ये लिहिलेलं हे पुस्तक आहे. वास्तुशिल्प रचनेविषयी त्यांनी अत्यंत रसाळ पद्धतीनं, ललित अंगानं लिहिलं आहे. माझ्या आधीच्या दोन्ही अभिवाचनांमध्ये नाटय़ होतं. ‘किमया’मध्ये तसं थेट नाटय़ नाही. पण ते खूपच मजेशीर, गंमतशीर आहे. ते सगळं या वाचनातून पोहोचवता येतं का, वाचनाला इन्स्टॉलेशन्स, म्युरल्सची जोड देऊन काही दृश्य प्रतिमा निर्माण करून दृश्यात्मक अनुभव देता येईल का, याचा प्रयत्न आहे. ‘किमया’च्या अभिवाचनाची संकल्पना माझ्यासह वास्तुरचनाकार अमोल चाफळकर याची आहे. राहुल लामखडेनं प्रकाशयोजना आणि नरेंद्र भिडे यांनी संगीताची बाजू सांभाळली आहे. ‘किमया’च्या सोलापूरला झालेल्या प्रयोगांना खूप भरभरून प्रतिसाद मिळाला. अभिवाचनामुळे खूप लोक वाचनाकडे वळतात असा माझा अनुभव आहे. कारण, अभिवाचनामुळे एका वेळी खूप लोकांपर्यंत ते साहित्य पोहोचतं. त्याविषयी कुतूहल, उत्सुकता निर्माण होते. ते पुस्तक खरेदी करतात, वाचतात.

*  अभिवाचनाचे हे प्रयोग नियमितपणे व्हावेत का, विशेषत: अभिनेत्यांनी हे प्रयोग करावेत का, तुम्हाला काय वाटतं?

— पुण्यात आसक्त, नाटक कंपनी या दोन संस्थांनी काही काळापूर्वी ‘रिंगण’ हा वाचनाशी संबंधित उपक्रम केला होता. ‘तर्काच्या खुंटीवरून..’ मी त्यात वाचलं होतं. तसंच ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष, माधुरी पुरंदरे अशा अनेकांनी त्यात सहभाग घेतला होता. त्याला खूपच उत्तम प्रतिसाद मिळाला होता. पुण्यात लोक तिकीट काढून वाचनाच्या कार्यक्रमाला येतात हे मी जेव्हा पुण्याबाहेरच्या लोकांना सांगतो, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटतं. ते अक्षरश: थक्कहोतात. वाचन नक्कीच महत्त्वाचं आहे. अभिनेत्यांनी रियाज म्हणून अभिवाचन करणं आवश्यकच आहे. भाषा, भाषासौंदर्य, लहेजा हे समजून घेण्यासाठी, त्याच्या अभ्यासासाठी अभिवाचन कार्यक्रम उपयुक्त ठरतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमी खर्चात, कुठेही त्याचे प्रयोग करता येतात.