22 January 2020

News Flash

रसिकांनी अनुभवला ‘कटय़ार’चा असाही प्रवास!

भोरच्या राजवाडय़ामध्ये भरलेल्या दरबारात महेश काळे याने आळविलेले ‘घेई छंद मकरंद’चे सूर.. सांगली येथील राजवाडा पाहण्याबरोबरच गणेशमूर्तीचे दर्शन...

भोरच्या राजवाडय़ामध्ये भरलेल्या दरबारात महेश काळे याने आळविलेले ‘घेई छंद मकरंद’चे सूर.. सांगली येथील राजवाडा पाहण्याबरोबरच गणेशमूर्तीचे दर्शन..  खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर.. फलटण येथील राजवाडा.. ‘कटय़ार काळजात घुसली’ चित्रपटाचा झाला तसा प्रवास करीत ८० जणांनी ‘कटय़ार’ची गोडी अनुभवली. ‘फेसबुक फ्रेंड्स’च्या या अनोख्या सहलीने रसिकांना आनंद झाला आणि सर्वानीच ‘कटय़ार’च्या शंभराव्या दिवशी भेटण्याचा निर्धारही केला.
‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटाच्या निर्मितीचा आणि चित्रीकरणाचा प्रवास हा प्रत्यक्ष तेथे जाऊन अनुभवावा ही संकल्पना सुरेश नाईक यांना सुचली. गार्डियन कॉपरेरेशनचे मनीष साबडे यांनी ही संकल्पना उचलून धरली. चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेता सुबोध भावे, निर्माते सुनील फडतरे, पाश्र्वगायक महेश काळे, छायाचित्रकार वैभव चिंचोळकर यांना बरोबर घेऊन ही सहल काढण्याचे निश्चित झाले. मनीष साबडे यांनी फेसबुकवर ही कल्पना मांडली आणि पाहता पाहता ८० जणांनी आपला सहभाग नोंदविला.
या सहलीविषयी माहिती देताना सुरेश नाईक म्हणाले, भोर येथे सुबोध भावे याने संहितेवरून चित्रपट करताना करावे लागलेले बदल, प्रत्यक्ष चित्रीकरण करतानाची तांत्रिक करामत, त्यानुसार कलाकारांची केलेली निवड या विषयीची माहिती दिली. पंतसचिव यांच्या राजवाडय़ामध्ये महेश काळे याने चित्रपटातील ‘घेई छंद मकरंद’, ‘सुरत पियाँ की’ ही गीते सादर केली. त्यानंतर आमची सहल सांगली येथील राजवाडय़ामध्ये पोहोचली. राजघराण्याचे पटवर्धन कुटुंबीय बरेचदा तेथे वास्तव्यास असतात. सायंकाळी महेश काळे याने सर्व नाटय़पदे सादर केली आणि सुबोधच्या रसाळ निवेदनाने या मैफलीमध्ये रंग भरले. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिरामध्ये महेशने ‘भोला भंडारी’ हे गीत सादर केले. फलटण येथील राजवाडय़ामध्ये चित्रित केलेल्या अनेक प्रसंगांचे चित्रीकरण डोळय़ांसमोर उभे राहिले. वाडय़ातील वरच्या मजल्यावर रामाचे दर्शन घेतले. दोन दिवसांची ही सहल अनुभवताना आम्ही प्रत्येक जण जणू ‘कटय़ार’च्या चमूचाच एक भाग झालो होतो. स्मृतींच्या कुपीत जपून ठेवावी, अशी सहल कधीच प्रवास संपू नये असे वाटत असतानाच संपली.

First Published on February 16, 2016 3:20 am

Web Title: audience experience katayara travel facebook friends unique trip
Next Stories
1 पाश्चात्य विद्वानाकडून संस्कृत व्याकरणाचा पाठ! जगभरात ‘थेट प्रक्षेपण’
2 ‘पुणे ऑटो एक्स्पो’ प्रदर्शनामध्ये यंदा हार्ले डेव्हिडसनसह सुपर बाइकचे आकर्षण
3 पुण्यात ‘व्हॅलेंटाइन डे’ पार्टीत तरुणीवर बलात्कार
Just Now!
X