परीक्षा आणि निवडणुकीमुळे नाटकांचा प्रेक्षक दुरावला

पुणे : सध्या सुरू असलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षा आणि लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता यामुळे नाटकवेडा मराठी माणूस नाटकापासून दुरावला आहे. ‘आधीच उल्हास त्यात निवडणुकांचा मास’ सुरू झाल्यामुळे नाटय़निर्माते चिंतेत सापडले आहेत. राजकीय सभांमुळे करमणूक होत असताना रंगमंदिरामध्ये नाटकाला येणार कोण, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

दहावी-बारावीची परीक्षा सुरू झाल्यानंतर मार्च आणि एप्रिल हे दोन महिने नाटय़ व्यवसायाच्या दृष्टीने अडचणीचे असतात. असे दरवर्षीच घडत असते. त्यामुळे यामध्ये नवीन असे काहीच नाही. मात्र, यंदा त्यामध्ये लोकसभा निवडणुकीची भर पडली आहे. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर नाटकाला येणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येमध्ये घट झाली आहे, अशी माहिती मनोरंजन संस्थेचे मोहन कुलकर्णी यांनी दिली. मराठी रंगभूमीवर सध्या ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ आणि ‘तिला काही सांगायचंय’ ही दोन नाटके हाउसफुल्ल गर्दी खेचत आहेत. मात्र, या दोन नाटकांचा अपवाद वगळता अन्य नाटकांना फारसा प्रेक्षकवर्ग लाभत नाही हे वास्तव आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

संवाद संस्थेचे सुनील महाजन म्हणाले, दोनतीन नाटकांचा अपवाद वगळता नाटय़ व्यवसाय सध्या संक्रमणावस्थेतून जात आहे. परीक्षा आणि निवडणुका यामुळे नाटकाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे, असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. त्यातच आता उन्हाच्या झळांचीही भर पडली आहे. राजकीय वातावरण तापत असताना दूरचित्रवाणीवर करमणूक होत असताना नाटकाला येणार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रंगभूमीवर गर्दी खेचणारे अभिनेते प्रशांत दामले आणि कविता लाड यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ नाटकाचा चमू सध्या अमेरिका आणि इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. त्यामुळे ‘तिला काही सांगायचंय’, ‘अलबत्या गलबत्या’ या दोन नाटकांना सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.