गेल्या काही वर्षांपासून गंभीर गुन्ह्य़ांची उकल करण्यात तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असला तरी पारंपरिक पद्धतीने करण्यात येणाऱ्या तपासात गुन्हेगारांचे हातांच्या बोटांचे ठसे महत्त्वाचे ठरतात. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अंगुलीमुद्रा विभागात राज्यातील सहा लाख ८४ हजार ८१६ विविध गुन्ह्य़ातील सराइतांच्या बोटांचे ठसे (फिंगर प्रिंट) संग्रहित करण्यात आले आहेत. गुन्हेगारांचे बोटांचे ठसे संग्रहित करण्यात महाराष्ट्र देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे.

पोलीस ठाण्यात आणलेल्या आरोपीच्या दहा बोटांचे ठसे घेण्यात येतात. त्याला अंगुलीमुद्रा पत्रिका असे म्हणतात. त्यानंतर ही अंगुलीमुद्रा पत्रिका सीआयडीकडे पाठविण्यात येते. त्याद्वारे आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी समजण्यास मदत होते. अटकेत असलेल्या आरोपीची पार्श्वभूमी गुन्हेगारी असेल तर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई तसेच पोलीस कोठडी मिळवण्यासाठी मदत होते.  सीआयडीकडून अंगुलीमुद्रा पत्रिकेतील ठसे जतन करण्यात येतात. गेल्या वर्षी राज्यातील २ लाख ३६ हजार १२२ आरोपींचा अंगुलीमुद्रा शोधपत्रिकेद्वारे पूर्व शिक्षेचा तपशील तपासण्यात आला. त्यापैकी चार हजार ३०९ आरोपींच्या पूर्व शिक्षेचा (हिस्ट्री शिटर) तपशील पोलीस ठाण्यांना कळविण्यात आला.

खून, बलात्कार, दरोडा, चोरी, घरफोडी असे गुन्हे घडल्यास पोलीस ठाण्यांकडून सीआयडीच्या अंगुलीमुद्रा विभागाक डे माहिती देण्यात येते. अंगुलीमुद्रा तज्ज्ञ (फिंगर प्रिंट एक्सपर्ट) घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळावर असलेल्या वस्तूंवरील आरोपींच्या बोटांचे अस्पष्ट ठसे विकसित करतात. शास्त्रोक्त पद्धतीने या ठशांची पडताळणी करून अंगुलीमुद्रा केंद्रात पाठविण्यात येते. एखादा गुन्हा केल्यानंतर सराईत पसार होतो. घटनास्थळीवरील ठशांवरुन सराइताचा माग काढणे सोपे  ठरते.

‘अ‍ॅम्बिस’ संगणकीय प्रणाली

अंगुलीमुद्रा विभागाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी शासनाने ‘अ‍ॅम्बिस’ (अ‍ॅटोमोटेड मल्टिमोडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम) या संगणकीय प्रणालीची खरेदी केली आहे. या संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात आहे. या प्रणालीत शिक्षा झालेले तसेच अटक आरोपींच्या हाताच्या दहा बोटांच्या ठशांसह, पंजा, त्यांचे छायाचित्र, डोळयांचे बुबुळ अशी माहिती संकलित करण्यात येणार आहे. या प्रणालीचे कामकाज अहोरात्र सुरू राहणार असून गंभीर गुन्हा घडल्यानंतर काही वेळात सराइतांची सर्व माहिती संबंधित पोलीस ठाण्याला उपलब्ध होईल. या संगणकीय प्रणालीद्वारे गंभीर गुन्ह्य़ांची उकल त्वरित करता येणे शक्य होईल, असे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

राज्यातील २३३ गुन्हे उघड

सराइताच्या बोटांच्या ठशांवरून २०१९ मध्ये राज्यात घडलेल्या १८२ गुन्ह्यंची उकल करण्यात आली होती. यंदाच्या वर्षी सप्टेंबर महिना अखेरीपर्यंत घटनास्थळी सापडलेल्या ठशांवरुन ५१ गुन्ह्य़ांची उकल करण्यात आली होती. करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर सीआयडीच्या अंगुलीमुद्रा विभागातील १२ अंगुलीमुद्रा तज्ज्ञ करोनाबाधित झाले होते. अशा परिस्थितीतही अंगुली मुद्रा विभागाचे कामकाज नियमित सुरू होते.