शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के  राखीव जागांवरील प्रवेशांसाठी ३१ ऑगस्टची मुदत देण्यात आली आहे. प्रवेशासाठीच्या सोडतीमध्ये प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश न घेतल्यास त्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार नसल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे. १७ मार्चला काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे, छायांकित प्रति घेऊन संबंधित शाळेत ३१ ऑगस्टपूर्वी जाऊन प्रवेश निश्चित करावा. पालकांना शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करणे शक्य नसल्यास ई-मेलद्वारे, कागदपत्रे शाळेस पाठवून किंवा दूरध्वनीद्वारे शाळेतील मुख्याध्यापकांशी संपर्क साधून पालकांनी प्रवेश निश्चित करावा.  आरटीई संकेतस्थळावरून मिळालेल्या यादीनुसार प्रवेशासाठी न आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना संपर्क साधून शाळांनी प्रवेशाची कार्यवाही मुदतीत पूर्ण करण्याची सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली.

प्रवेशासाठी राज्यातील ९ हजार ३३१ शाळांमध्ये यंदा १ लाख १५ हजार ४५५ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी अर्ज के लेल्या २ लाख ९१ हजार ३६८ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ९२६ विद्यार्थ्यांना सोडतीद्वारे प्रवेश जाहीर झाले आहेत. त्यातील ५० हजार ९६७ विद्यार्थ्यांना तात्पुरत्या स्वरुपात प्रवेश देण्यात आले आहेत. तर ३८ हजार ७७८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.