राज्य शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाने सर्वोत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) म्हणून औंध आयटीआयची निवड केली आहे. जागतिक युवा कौशल्य दिनाच्या औचित्याने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते हे पारितोषिक सोमवारी प्रदान करण्यात आले.

राज्यातील ४१७ शासकीय आणि ४०० हून अधिक खासगी आयटीआयमधून औंध आयटीआयची निवड करण्यात आली. राज्यातील सात शासकीय आणि दोन खासगी अशा नऊ आयटीआय संस्थांना शासनाकडून गौरवण्यात आले. त्यात पुणे जिल्ह्य़ातील खेड येथील आयटीआयचाही समावेश आहे.

सन १९४६ मध्ये स्थापन झालेली औंध आयटीआय ही राज्यातील एक जुनी संस्था आहे. या संस्थेत २४०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एकूण ३४ अभ्यासक्रम येथे शिकवले जातात. जागतिक बँकेने दिलेल्या निधीच्या माध्यमातून कौशल्य विकास मंत्रालयाने स्किल्स स्ट्रेन्थनिंग फॉर इंडस्ट्रीयल व्हॅल्यूज एनहान्समेंट म्हणजे ‘स्ट्राइव्ह’ प्रकल्प सुरू करून त्यात औंध आयटीआयची निवड केली. त्यामुळे औंध आयटीआयचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे.

केंद्र सरकार देशातील पहिले कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करणार आहे. या नियोजित विद्यापीठासाठी देशातील सर्व आयटीआय संस्थांमधून दक्षिण भारतातील राज्यातील एक आणि पुण्याचे औंध आयटीआय अशा दोन संस्था या विद्यापीठासाठीच्या स्पर्धेत आहेत.

राज्यात औंध आयटीआय सर्वोत्कृष्ट ठरल्याने संस्थेसाठी ही मोठी जमेची बाजू ठरणार आहे, असे औंध आयटीआयच्या व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष आणि शिवाजीनगरचे आमदार विजय काळे यांनी सांगितले.

आधुनिक तंत्रज्ञान अभ्यासक्रम

औंध ‘आयटीआय’मध्ये पारंपरिक अभ्यासक्रमांसह रोबोटिक तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकलचे आधुनिक तंत्रज्ञान मेकॅक्ट्रॉनिक्स असे अत्याधुनिक अभ्यासक्रमही शिकवले जातात. संस्थेसह सामंजस्य करार केलेल्या १२ कंपन्यांना त्यांच्या प्रयोगशाळा उभारण्यासाठी आयटीआयमध्ये जागा देण्यात आली आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळण्यात होत आहेत. त्यामुळे अनेक कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटसाठी येतात आणि विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळतात, असे असे प्राचार्य प्रकाश सायगावकर यांनी सांगितले.