औंध लष्करी तळावरील जवानाने मेजर आणि अन्य तीन सहकाऱ्यांवर मारहाणीचा आरोप केला आहे. पुण्यातील सांगवी पोलिसांनी जवानाच्या तक्रारीवरुन मेजर आणि अन्य तिघांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला आहे. सोबत दारु प्यायला नकार दिला म्हणून मेजर आणि अन्य तिघांनी आपल्याला मारहाण केली असा आरोप जवानाने केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

औंध लष्करी तळावर तीन जूनच्या संध्याकाळी ही घटना घडल्याचा दावा जवानाने केला आहे. बेशुद्ध होईपर्यंत आपल्याला मारहाण करण्यात आली. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी औध येथील रुग्णालयात होतो असे त्याने पोलिसांना सांगितले. दक्षिण कमांड मुख्यालयातील लष्करी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सदर घटनेबद्दल पूर्ण माहिती मिळालेली नाही. त्यामुळे प्रतिक्रिया देता येणार नाही असे सांगितले.

मेजरसह तिघेजण दारु पीत होते. त्यांनी जवानाला तिथे बोलावले व दारु पिण्यास सांगितली. आपण दारु पीत नाही असे त्यांना सांगितले. पण त्यांनी मला पकडले व जबरदस्तीने दारु पाजण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी दारु पिण्यास नकार दिला तेव्हा मेजर आणि अन्य तिघांनी मला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली असे पोलिसांच्या पत्रकात म्हटले आहे.

मी जमिनीवर पडल्यानंतर मेजर मला लाकडी काठीने मारत होता तर अन्य तिघे लाथांनी प्रहार करत होते. औध लष्करी तळावरील अधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. वरिष्ठ लष्करी अधिकारी पहिली चौघांची चौकशी करतील. लष्कराची चौकशी पूर्ण झाल्यानंतर पोलीस चौघांना ताब्यात घेतील.