अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पहिले युवा संमेलन फेब्रुवारीमध्ये औरंगाबाद येथे होणार आहे. या संमेलनासाठी विरोध करणाऱ्या मराठवाडा साहित्य परिषदेवरच या संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महामंडळाचे उपाध्यक्ष भालचंद्र शिंदे, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनील महाजन या वेळी उपस्थित होते. महामंडळाच्या बैठकीतील या निर्णयाची माहिती सरकारला कळविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
सरकारने आनंदाने आणि विश्वासाने युवा संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी साहित्य महामंडळाकडे सोपविली आहे. या संमेलनासाठी २५ लाख रुपयांच्या अनुदानाची तरतूद झाली असून त्यासंदर्भात शासकीय अध्यादेशही निघाला आहे. महामंडळाच्या बैठकीमध्ये या विषयावर विस्तृत चर्चा झाली आणि पहिले युवा संमेलन औरंगाबाद येथे घेण्याचे निश्चित करण्यात आले. मराठवाडा साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी हे संमेलन यशस्वीपणे घेऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला असल्याचेही वैद्य यांनी सांगितले. युवा संमेलनासाठी महामंडळाने मार्गदर्शक समिती नियुक्त केली आहे. महामंडळाच्या चार प्रमुख पदाधिकाऱ्यांसह प्रा. उषा तांबे, मनोहर म्हैसाळकर, संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, मराठवाडा साहित्य परिषदेचे प्रमुख पदाधिकारी यांचा या समितीमध्ये समावेश आहे. युवा संमेलनातील कार्यक्रमांसंदर्भात २३ नोव्हेंबर रोजी बैठक होणार असल्याचेही वैद्य यांनी सांगितले.