X
X

लेखकांमध्ये चित्रसाक्षरतेचा अभाव

READ IN APP

लेखक शब्दातून चित्र निर्माण करतात. पण, चित्र पाहून त्यांना शब्द लिहायला जमत नाही.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘मसाप गप्पां’मध्ये चित्रकार रविमुकुल यांचे मत
लेखक शब्दातून चित्र निर्माण करतात. पण, चित्र पाहून त्यांना शब्द लिहायला जमत नाही. लेखकांच्या चित्रकल्पना केवळ हास्यास्पदच असतात असे नाही तर, त्यांच्यामध्ये चित्रसाक्षरतेचा अभाव आहे, असे मत प्रसिद्ध चित्रकार रविमुकुल यांनी व्यक्त केले. मुखपृष्ठ वाचकाला पुस्तकाकडे आकर्षित करून घेते. मग, त्या मुखपृष्ठाला वेष्टन म्हणून कसे हिणवले जाते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘मसाप गप्पा’अंतर्गत वंदना बोकील-कुलकर्णी यांनी रविमुकल यांची मुलाखत घेतली. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मििलद जोशी आणि कोशाध्यक्षा सुनीताराजे पवार या वेळी उपस्थित होत्या. काही मोजक्या लेखकांनाच मुखपृष्ठ आणि पुस्तकातील चित्रांचे महत्त्व समजते. चित्र काढता आली नाहीत तरी चालेल. चित्र वाचता आली तरी पुरेसे आहे. लेखकच चित्रकाराचा तुच्छतापूर्वक उल्लेख करणार असतील तर समाजाकडून काय अपेक्षा ठेवायच्या, असा प्रश्न रविमुकुल यांनी उपस्थित केला. आपल्याकडे पुस्तके बंदिस्त करण्याची पद्धत आहे. मग, मुलांना चित्राची गोडी लागणार तरी कशी, याकडे लक्ष वेधून ते म्हणाले, चित्र ही स्वायत्त कला असून ती वैयक्तिक स्वरूपाचीदेखील आहे. मारून मुटकून चित्रकार घडविण्याचा प्रयत्न करू नये. मुलांना चुकू द्यावे. या चुकांतूनच मुले शिकत असतात. त्यांना रंगांशी खेळू द्यावे. खरा कलाकार हा त्यातूनच घडत असतो, असे म्हणाले .अभिनव कला महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी पुण्यामध्ये आलो आणि रस्त्यावरची शाळा अनुभवली. चित्रकला शिकून येत नाही असे सांगत प्राध्यापकांनी तू बाहेरच शिक्षण घे हा सल्ला दिला. अभ्यासक्रम पूर्ण केला खरा. पण, खरी चित्रकला बाहेरच शिकलो, असे रविमुकुल यांनी सांगितले. वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले.

 

23
X