पुणे : खासगी प्रयोगशाळेतून आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर करोना अहवाल सकारात्मक आल्याने सांगवीतील एका रिक्षाचालकाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, खासगी रुग्णालयातील उपचारांचा खर्च परवडणारा नसल्याने रिक्षाचालकाने दोन दिवसांत पिंपरी-चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात (वायसीएम) दाखल होण्याचा निर्णय घेतला. वायसीएम रुग्णालयांत पुन्हा आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर अहवाल नकारात्मक आला. दोन दिवसांच्या खासगी रुग्णालयांतील उपाचारांपोटी या रिक्षाचालकाला तब्बल २४ हजार ५०० रुपयांचा
भुर्दंड पडला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खासगी प्रयोगशाळांमधील चाचण्यांच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सांगवी येथील रहिवासी दत्तात्रय साळुंखे यांनी त्यांना आलेला हा कटु अनुभव कथन के ला. ते म्हणाले, ‘२० मार्च रोजी सायंकाळी सर्दी आणि अंगात कणकण असल्याने औंध रस्त्यावरील खासगी रुग्णालयात धाव घेतली. मला मधुमेह असल्याने रुग्णालयात तत्काळ दाखल करून घेण्यात आले आणि सलाईन लावले. त्यानंतर प्रतिजन (अ‍ॅण्टीजन) आणि आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने सोमवारी सकाळी करोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्याचे सांगण्यात आले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने गृह विलगीकरण करायला परवानगी द्यावी, अशी मागणी रुग्णालयाकडे के ली. त्यानुसार रुग्णालयाने दोन दिवसांचे तब्बल २४ हजार ५०० रुपये देयक देण्यात आले.’

साळुंखे यांचा आरोग्य विमा असल्याने त्यांनी कागदपत्र आरोग्य विमा कं पनीला पाठवताच १५ हजार रुपये विमा मंजूर झाला. उर्वरित पैसे भरून ते रुग्णालयातून बाहेर पडले. साळुंखे यांनी मंगळवारी सकाळी पिंपरी-चिंचवड महापालिके च्या वायसीएम रुग्णालयात पुन्हा प्रतिजन आणि आरटीपीसीआर चाचणी के ली. या चाचणीच्या अहवालांत त्यांना करोना संसर्ग नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे न झालेल्या करोनामुळे रिक्षाचालक साळुंखे यांना २४ हजार ५०० रुपयांचा भरुदड पडला.

पोलीस ठाण्यात तक्रार

साळुंखे यांनी या प्रकाराबाबत चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते नीलेश निकम यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार दिली आहे. खासगी प्रयोगशाळा आणि खासगी रुग्णालयांकडून अशाप्रकारे नागरिकांची लूट करण्यात येत असल्याने आपल्यासोबत घडलेला प्रकार अन्य कोणासोबत घडू नये, म्हणूनच तक्रार दिल्याचे साळुंखे यांनी सांगितले.