मनमानी भाडेवसुली, प्रवासी नाकारणे यांत वाढ

शहरात काही रिक्षा चालकांकडून मनमानी पद्धतीने भाडेवसुली करण्याबरोबरच भाडे नाकारण्याच्या प्रकारांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. याबाबत प्रवाशांकडून सातत्याने तक्रारी करण्यात येत आहेत. पोलिसांचा वाहतूक विभाग आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने मध्यंतरी अशा प्रकारांबाबत रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. मात्र, कारवाई थंड होताच तक्रारींनी पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे रिक्षा चालकांवरील कारवाईमध्ये सातत्य ठेवण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

पुणे शहरामध्ये सद्य:स्थितीत ५० हजारांच्या आसपास रिक्षा आहेत. हकीम समितीच्या सूत्रानुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने १ जुलै २०१५ रोजी शहरात रिक्षांना भाडेवाढ दिली. त्यानुसार पहिल्या दीड किलोमीटरसाठी १८ रुपये, तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १२.३१ रुपये भाडे देण्यात आले आहे. शहरातील प्रत्येक रिक्षाला इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्यात आले असून, सर्वच रिक्षा सीएनजी इंधनावर परावर्तित करण्यात आल्या आहेत. इंधन, परतीचा प्रवास, दुरुस्ती-देखभाल आदी सर्व गोष्टी लक्षात घेऊनच सध्याचे भाडे असून, ते सर्वाधिक असल्याबाबत आक्षेप घेण्यात येतो. असे असतानाही मीटरनुसार भाडे घेण्यास अनेक रिक्षा चालकांकडून नकार देण्यात येतो. प्रवाशाने एखादे स्थळ सांगितल्यास मीटरनुसार होणाऱ्या भाडय़ापेक्षा तीस ते चाळीस टक्के अधिकचे भाडे सांगितले जाते.

शहरातील एका प्रवाशाने सांगितलेल्या अनुभवानुसार बालगंधर्व रंगमंदिर ते पुणे मनपा बसस्थानक हे अंतर एक किलोमीटरपेक्षाही कमी आहे. असे असतानाही रिक्षा चालकाकडून या प्रवासासाठी अगदी दिवसाही तब्बल चाळीस रुपयांची मागणी करण्यात आली. पहिल्या दीड किलोमीटरसाठी १८ रुपये अधिकृत भाडे असताना एक किलोमीटरपेक्षाही कमी प्रवासासाठी चाळीस रुपये भाडे सांगण्याचा प्रकार प्रवाशांची लुबाडणूक करणारा आहे. काही वेळेला प्रवासाची गरज आणि नाईलाजास्तव प्रवासी या मनमानी भाडेवसुलीला बळी बडतात.

मनमानी भाडेवसुलीसह प्रवासी नाकारण्याच्या प्रकारातही लक्षणिय वाढ झाल्याचे प्रवाशांच्या तक्रारीवरून दिसून येते. प्रत्येक खासगी रिक्षा थांब्यावरील रिक्षा चालकांचा एक स्वतंत्र गट आहे. प्रवासी घेण्याचा विभागही या गटाने ठरवून घेतला आहे. त्यामुळे आपल्या विभागातील मार्गावर किंवा एक किलोमीटरच्या आतमधील भाडे असेल, तर ते तातडीने स्वीकारले जाते. मात्र, दुसऱ्या विभागातील किंवा काहीसा परतीचा प्रवास कराव्या लागणाऱ्या ठिकाणचे भाडे नाकारले जाते.

हे भाडे घ्यायचे झाल्यास अव्वाच्या सव्वा रक्कम सांगितली जाते. विशेष म्हणजे हकीम समितीच्या भाडेवाढीच्या सूत्रामध्ये परतीच्या प्रवासाचाही विचार केला आहे. त्यामुळे या रिक्षा चालकांबाबत पुन्हा ठोस मोहीम सुरू करून कारवाई व्हावी आणि त्यात सातत्य ठेवावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवडला अद्यापही मीटरची प्रतीक्षा

पुणे शहरामध्ये मनमानी भाडेवसुली आणि भाडे नाकारण्याच्या तक्रारी आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये त्यापेक्षाही वेगळेच चित्र पाहायला मिळते. शहरात ९० टक्क्य़ांहून अधिक रिक्षा चालक भाडेआकारणीसाठी मीटरच वापरत नसल्याचे वास्तव आहे. कोणत्याही ठिकाणी जायचे ठरल्यास थेट ठोक रक्कम सांगितली जाते. अनेक मार्गावर अनधिकृतपणे क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक केली जाते. त्यामुळे अशा वाहतुकीसाठी मीटरचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे रिक्षाला नियमानुसार इलेक्ट्रॉनिक मीटर बसले असले, तरी त्यानुसार भाडेआकारणीची पिंपरी-चिंचवडकरांना अद्यापही प्रतीक्षा आहे.