जंगली महाराज रस्त्यावर स्वयंचलित ई-टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर शहरातील आठ ठिकाणी येत्या काही दिवसांमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे. एकूण चौदापैकी आठ ई-टॉयलेटची उभारणी पहिल्या टप्प्यात शहराच्या विविध भागात करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

फर्ग्यूसन रस्त्यावरील हॉटेल रूपाली समोर, हिरवाई गार्डन, शिवाजीनगर न्यायालयाचा परिसर, सेनापती बापट रस्ता, वारजे उड्डाण पूल परिसर, नीलायम चित्रपटगृह, विमाननगर आणि सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुलाजवळ असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या ठिकाणी ई-टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सार्वजनिक स्वच्छतागृहांची आवश्यकता लक्षात घेता गर्दीच्या ठिकाणी स्वच्छ स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावीत, यासाठी खासदार अनिल शिरोळे यांच्या विकास निधीतून शहरात अत्याधुनिक आणि स्वयंचलित ई-टॉयलेटची उभारणी करण्यात येणार आहे. जंगली महाराज रस्त्यावरील या ई-टॉयलेट सेवा गुरुवारपासून सुरू करण्यात आली. महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, नीलिमा खाडे, स्वाती लोखंडे, ज्योत्स्ना एकबोटे, ईराम सायंटिफिक कंपनीचे प्रमुख विपणन व्यवस्थापक बरनार्ड अ‍ॅनड्रेड, अशोका डेव्हलपर्सचे विशाल कदम, आदित्य चासकर आदी या वेळी उपस्थित होते.