अल्पसंख्याकांची म्हणजेच जगातील केवळ ५ टक्के लोकसंख्येची अवेस्तन ही बोली भाषा.. हिंदूू धर्मीयांचे वेद आणि पारशी समाजाचा धर्मग्रंथ अवेस्ता याच्यातील साम्य.. या साऱ्याची उत्सुकता मनात साठवत अवेस्तन ही नवी परकीय भाषा शिकण्याच्या आनंदशाळेला सोमवारपासून सुरूवात झाली. अगदी महाविद्यालयीन युवक-युवतींपासून ते मध्यमवयीन आणि ज्येष्ठ नागरिक असे विविध वयोगटातील साठहून अधिक जण अवेस्तन भाषा शिकण्याच्या उत्कंठेने विद्यार्थी झाले होते.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या ९८ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून लंडन विद्यापीठाच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या अवेस्ता धर्मग्रंथ आणि अवेस्तन भाषाविषयक अभ्यासक्रमाचा सोमवारी प्रारंभ झाला. भारती विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एरिच भरूचा यांच्या हस्ते या अभ्यासक्रमाचे उद्घाटन झाले. लंडन विद्यापीठातील अवेस्ताच्या अभ्यासक प्रा. अल्मूट हिंत्झे या वर्गास मार्गदर्शन करणार आहेत. संस्थेच्या सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष अॅड. नंदू फडके, नियामक मंडळाचे अध्यक्ष अभय फिरोदिया, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर, पारशी धर्मगुरु रुयिंटन पीर, ज्येष्ठ प्राच्यविद्या संशोधक डॉ. म. अ. मेहेंदळे या प्रसंगी उपस्थित होते.
पणजोबांमुळे मला अवेस्तन भाषेचा परिचय झाला; अर्थात अवेस्तन भाषेतील लेखनाचे इंग्रजी भाषांतर वाचूनच, अशी आठवण डॉ. एरिच भरूचा यांनी सांगितली. अवेस्तन भाषा आत्मसात करण्यासाठी पणजोबा केवळ संस्कृत शिकले असे नाही, तर अवेस्तन भाषेचे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले होते, असे त्यांनी सांगितले. अवेस्तामधील पर्यावरणासंबंधीचे विचार हे वेदांतील तत्त्वज्ञानाशी साम्य सांगणारे आहेत. सध्याच्या काळात विचार संस्कृती संकुचित होत असताना वेगळ्या भाषेतील विचार आत्मसात करण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे, असा गौरवही भरूचा यांनी केला.
केवळ पाच टक्के लोकसंख्या अवेस्तन भाषा बोलत असले तरी तत्त्वज्ञानासह सर्व विषयांना कवेत घेणारी ही भाषा समृद्ध असल्याचे पीर यांनी सांगितले. अवेस्तन बोलणाऱ्यांची संख्या कमी असली तरी ही जिवंत भाषा आहे. संगणक शास्त्रज्ञांनी अवेस्तन भाषेचा टंक (फॉन्ट) विकसित केला असल्याचे प्रा. अल्मूट हिंत्झे यांनी सांगितले.