बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी वारेमाप वृक्ष तोडण्यास परवानगी देणाऱ्या महापालिकेने गेल्या दोन वर्षांपासून नाटय़प्रेमींचा जीव टांगणीला लावला आहे. भरत नाटय़मंदिरा लगतच्या वावळ्या या एका जुन्या वृक्षाच्या फांद्या धोकादायक झालेल्या असताना आणि त्याबाबत दोन वर्षे पाठपुरावा करूनही फांद्या काढून टाकण्यास महापालिकेच्या उद्यान विभागाला वेळ मिळालेला नाही.

सदाशिव पेठेतील भरत नाटय़ संशोधन मंदिरालगत वावळ्याचे सत्तर ते पंचाहत्तर वर्षांचे जुने झाड आहे. या झाडाच्या फांद्या जोरदार पावसामुळे आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे पडण्याची दाट शक्यता आहे. गेल्या वर्षी १७ मे २०१८ रोजी या झाडाची एक मोठी फांदी नाटय़ मंदिराच्या आवारात पडली होती. त्याआधीपासून भरत नाटय़ मंदिर व्यवस्थापनाकडून धोकादायक फांद्या तोडण्यात याव्यात, अशी मागणी उद्यान विभागाकडे आणि महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली होती. धोकादायक फांद्या लवकर काढल्या जातील, असे आश्वासनही व्यवस्थापनाला देण्यात आले होते. मात्र अद्यापही कार्यवाही करण्यात आलेली नाही.

भरत नाटय़मंदिरात अनेक नाटकांचे प्रयोग तसेच नाटय़स्पर्धा सातत्याने होत असतात. सध्या बालनाटय़ महोत्सव संपला असून येत्या काही दिवसांमध्ये पुरुषोत्तम करंडक, रोटरी नाटय़ स्पर्धा, आंतरराज्य नाटय़ स्पर्धा, राज्य नाटक स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे भरत नाटय़ मंदिराचे अध्यक्ष आनंद पानसे आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या बाबत लेखी निवेदन दिले होते. महापालिकेकडे तक्रारही केली होती. हा वृक्ष नव्वद टक्के रस्त्यावर असून त्याच्या उंच फांद्या भरत नाटय़ मंदिराच्या मोकळ्या जागेकडे सरकल्या आहेत. महापालिकेच्या नियमानुसार व्यवस्थापनाला खासगी व्यक्तींद्वारे धोकादायक फांद्या काढून टाकण्याचा अधिकार नाही. मात्र तक्रार करूनही महापालिकेकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे नाटय़प्रेमींकडूनही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

शहरातील बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी नियम धाब्यावरून बसवून महापालिकेच्या उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण समितीकडून मोठमोठे वृक्ष तोडण्यास परवानगी दिली जाते. मात्र नियमानुसार तक्रार करून आणि दोन वर्षे सातत्याने पाठपुरावा करूनही धोकादायक फांद्या तोडण्यात येत नसल्यामुळे महापालिकेचा निष्क्रिय कारभारही यानिमित्ताने पुढे आला आहे. पावसाळ्यात एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

भरत नाटय़ मंदिराच्या आवारात गेल्यावर्षी झाडाची मोठी फांदी पडली. फांद्या काढण्यात याव्यात, यासाठी तक्रार अर्ज दिला आहे. क्षेत्रीय कार्यालयाबरोबरच उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांशीही दूरध्वनीवरून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र दोन वर्षांपासून फांद्या काढण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे. भविष्यात दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी महापालिकेची राहील.

– आनंद पानसे, अध्यक्ष, भरत नाटय़ मंदिर