तेलाच्या व्यापारातील राजकारण आणि अर्थकारण अमेरिका, चीन यांसारख्या प्रगत राष्ट्रांनी ओळखले असून स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. भारतामध्ये या विषयाचे गांभीर्य अजूनही जाणवत नाही. ऊर्जेशिवाय महासत्ता होण्याचे स्वप्न सत्यामध्ये येऊ शकणार नाही. त्यामुळे समाजामध्ये तेल साक्षरता वाढण्याची आवश्यकता असून यामध्ये मध्यमवर्गीयांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा प्रसिद्ध लेखक आणि ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी गुरुवारी व्यक्त केली.
विश्वास लायब्ररीच्या वर्धापनदिनानिमित्त राजहंस प्रकाशनचे संपादक आनंद हर्डीकर यांच्या हस्ते गिरीश कुबेर यांना आवडता लेखक पुरस्कार प्रदान करण्यात आला. गिरीश कुबेर यांनी पुरस्काराची रक्कम स्वयंसेवी संस्थेला देणगी देण्यासाठी लायब्ररीचे प्रमुख विश्वास देशपांडे यांच्याकडे सुपूर्द केली.
तेलाचे राजकारण आणि अर्थकारण या विषयाचे विविध पैलू कुबेर यांनी आपल्या मनोगतातून उलगडले. अणुचाचणीनंतर भारतावर आर्थिक र्निबध लादले गेले. भारताचे अनुकरण करीत पाकिस्ताननेही अणुस्फोट केले तेव्हा त्यांच्यावरही र्निबध लादण्यात आले. पाकिस्तानवर आर्थिक र्निबध आहेत तोपर्यंत सौदी अरेबियातून पाकिस्तानला दररोज ५० हजार बॅरल तेल दिले जाईल, अशी घोषणा सौदीच्या राजपुत्राने केली. या घटनांचा मागोवा घेत कुबेर म्हणाले, तेलाच्या व्यापारामध्ये अर्थकारण, िहसा, क्रौर्य आहे याची जाणीव झाली. यामध्ये नाटय़ तर पदोपदी आहेच. तेल या विषयाला उंची, खोली, अंतर या मिती आहेत. जागतिकीकरण, अर्थकारण हे विषय साहित्यामध्ये उमटत नाहीत हे ध्यानात घेऊन तेल या विषयाकडे मी आकृष्ट झालो. एम व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे आपण अर्थाधळे आहोत. सध्या युक्रेनमध्ये जे घडत आहे त्यामध्येही तेलाचा थेट संबंध आहे.
ओएनजीसी विदेश आंतरराष्ट्रीय करारासाठी नायजेरियामध्ये गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाचा मंत्रिमहोदयांशी फॅक्सद्वारे संपर्क साधेपर्यंत जो वेळ गेला त्या कालावधीत चीनमधून आलेल्या दोन अधिकाऱ्यांचे पथक नऊ विहिरींचा करार करून चीनला परतले, अशी माहिती देत कुबेर म्हणाले, भारताला १०० लिटरपैकी ८२ लिटर तेल आयात करावे लागते. त्यामुळे या विषयाचे गांभीर्य, पोटतिडीक असायला हवी. सौदीच्या तेलावर अवलंबून राहता येणार नाही हे जाणून घेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी २० वर्षांत या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याचा निर्धार केला. समुद्राच्या तळाशी एका छेदातून समांतर आठ विहिरी खणण्याचे फ्रँकिंग तंत्रज्ञान विकसित केले आहे. या गतीने २०१७ मध्ये अमेरिका स्वयंपूर्ण होऊ शकेल. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या आकाराहून अधिक परकीय चलनाची गंगाजळी चीनजवळ आहे. दीर्घकालीन योजना अमलात आणण्याचे धोरण चीनने स्वीकारले आहे. ऊर्जेविषयीची जाणीव याचाच आपल्याकडे अभाव आहे.
आनंद हर्डीकर यांनी गिरीश कुबेर यांच्या लेखनाविषयीची माहिती देत कुबेर यांनी राजकीय कादंबरी लेखन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.