‘प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान’ डॉ. ह. वि. सरदेसाई यांना प्रदान
‘‘समाजात एकी असणे, कुणाची पिळवणूक न करणे, दुसऱ्याच्या हिताचा विचार करणे हा सामाजिक प्रकृतीचा भाग आहे. आपण समाजाचा एक घटक आहोत असे म्हणण्याचा जेव्हा अभिमान वाटतो तेव्हा सामाजिक प्रकृती चांगली असते,’’ असे मत ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. ह. वि. सरदेसाई यांनी व्यक्त केले.
‘प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समिती’तर्फे देण्यात येणारा ‘प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान’ शुक्रवारी डॉ. सरदेसाई यांना ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. अक्षरधारा बुक गॅलरीचे संचालक रमेश व रसिका राठिवडेकर यांचा या वेळी गौरव करण्यात आला. समितीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, रंजना भोसले या वेळी उपस्थित होते.
सामाजिक आरोग्यात दुसऱ्याच्या हिताचा विचार महत्त्वाचा असतो, असे सांगून डॉ. सरदेसाई म्हणाले, ‘‘दरोडे, खून, बलात्कार ही हिंसा पाहता आपली सामाजिक प्रकृती चांगली नसून ती विकृत असल्याचे दिसून येते. समाजाचे आरोग्य चांगले असेल तर प्रत्येक मूल त्या पद्धतीने घडेल.’’
वैद्य म्हणाले, ‘‘आरोग्य व सामाजिक आरोग्याची स्थिती दयनीय आहे. रुग्णालये विक्रीस निघाली आहेत, ससूनमध्येही गरिबांना औषधे विकतच घ्यावी लागत आहेत, तर प्राथमिक आरोग्य केंद्रे बंद पडत आहेत. देशाला महासत्ता व्हायचे असेल तर शिक्षण व आरोग्यावर विशेष खर्च करायला हवा असे अमर्त्य सेन म्हणत. परंतु आता या दोन्ही बाजारू गोष्टी झाल्या आहेत. आपले जीवनच बाजारू बनवण्याचे प्रयत्न गेली वीस वर्षे सुरू आहेत. डॉ. सरदेसाई हे आरोग्य व सामाजिक आरोग्याचे निष्णांत धन्वंतरी असून ती सुदृढ करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करीत राहावे.’’