लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वाच्या आवडत्या असलेल्या नूडल्समध्ये शिसे आणि मोनोसोडियम ग्लूटामेट (अजीनोमोटो) या घटकांचे प्रमाण मान्यतेपेक्षा अधिक आहे का, हे तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोहीम हाती घेतली असून त्यात सध्या चर्चेत असलेल्या मॅगी नूडल्सबरोबर इतरही ब्रँडच्या नूडल्सचे नमुने घेतले जात आहेत.
एफडीएच्या पुणे विभागाचे सहायक आयुक्त दिलीप संगत म्हणाले, ‘मॅगीवर अद्याप बंदीचे आदेश आलेले नसून सध्या सुरू असलेल्या चर्चेच्या पाश्र्वभूमीवर खबरदारी म्हणून शुक्रवारपासून नूडल्सचे नमुने गोळा करण्यात येत आहेत. पुणे विभागात (पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर) ९ नमुने घेतले गेले. त्यातील ४ नमुने पुण्यातले आहेत. या नमुन्यांच्या विश्लेषणात त्यात शिसे व मोनोसोडियम ग्लुटामेट (अजिनोमोटो) आहे का, याची तपासणी होणार आहे. विश्लेषण अहवाल आल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्यात येईल.’
‘ही मोहीम अजून ८ ते १० दिवस चालणाार असून त्यात किराणा दुकान, घाऊक व किरकोळ व्यापारी, मॉल, वितरक यांच्याकडून नूडल्सच्या विविध बॅचचे नमुने घेण्यात येत आहेत’, असेही संगत म्हणाले.
उत्तर प्रदेशमध्ये मॅगी नूडल्समध्ये शिसे आणि मोनोसोडियम ग्लूटामेट या घटकांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळल्याच्या पाश्र्वभूमीवर नूडल्स हा खाद्यपदार्थ चर्चेत आला. दरम्यान मॅगीची उत्पादक कंपनी असलेल्या नेस्लेने मॅगीत मोनोसोडियम ग्लूटामेट वापरत नसून त्यातील घटक पदार्थामध्ये ते असेल, असे स्पष्टीकरण दिले होते.