पुढील आठवडय़ात आयुर्वेदिक औषधांच्या चाचण्यांना सुरुवात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : करोना विषाणूवरील आयुर्वेदिक औषधासाठी आयुर्वेद आणि अ‍ॅलोपॅथी पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. आयुर्वेदिक औषधाच्या देशभरातील चाचण्यांना पुढील आठवडय़ात सुरुवात केली जाणार असून, साधारणपणे चार महिन्यांत चाचण्यांचे निष्कर्ष हाती येतील.

‘करोना’वरील औषध प्रकल्पात त्यांचा सहभागी असलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधक डॉ. गिरीश टिल्लू यांनी ही माहिती दिली. डॉ. अरविंद चोप्रा यांच्या नेतृत्वाखाली या चाचण्या करण्यात येत आहेत. करोनावर प्रतिबंधात्मक आणि उपचार असे दोन प्रकारचे औषध विकसित करण्याचा प्रयत्न आहे. उपचारासाठीच्या औषधामध्ये आयुष ६४, ज्येष्ठमध, पिंपळी आणि गुळवेल यांचा समावेश आहे, तर प्रतिबंधात्मक औषधासाठी अश्वगंधाचा वापर करण्यात येत आहे. चाचण्यांच्या प्रकल्पासाठी संबंधित रुग्णालयांमध्ये आयुर्वेदिक आणि अ‍ॅलोपॅथी अशा दोन्ही उपचार पद्धतीच्या डॉक्टरांचा सहभाग असेल. पहिल्यांदाच अशा पद्धतीने दोन्ही उपचार पद्धती एकत्र येऊन औषध विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे डॉ. टिल्लू यांनी सांगितले. अ‍ॅलोपॅथीच्या औषधांसह आयुर्वेदिक औषधांचा काय परिणाम होतो हे चाचण्यांमध्ये पाहिले जाईल. तसेच रुग्णांचे संपूर्ण जीवनमान आणि औषधांचा दीर्घकाळ होणारा परिणाम विचारात घेतला जाईल. चाचण्यांचे निष्कर्ष हाती यायला साधारणपणे चार महिने लागतील. त्यानंतर करोनावरील औषध उपलब्ध होऊ शकेल. आयुर्वेद आणि अ‍ॅलोपॅथी पहिल्यांदाच एकत्र येऊन औषधासाठी संशोधन करत असून, देशातील संशोधनाच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे, असे डॉ. टिल्लू यांनी स्पष्ट केले.

देशभरात १५ ठिकाणी चाचण्या

पुण्यासह दिल्ली, मुंबई, नागपूर, अमरावती, वाराणसी आणि लखनौ या सात शहरांतील १५ रुग्णालयांमध्ये या चाचण्या करण्यात येणार आहेत. आयुष मंत्रालय, भारतीय वैद्यक संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) या तीन संस्थांच्या माध्यमातून या चाचण्या घेण्यात येणार आहेत, असेही डॉ. टिल्लू यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayurveda allopathy come together for coronavirus treatment zws
First published on: 04-06-2020 at 01:05 IST