News Flash

आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रिया परवानगी

वैद्यक परिषदेच्या निर्णयावर ‘आयएमए’ आणि ‘एमएमसी’ची नाराजी

(संग्रहित छायाचित्र)

आयुर्वेदातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना त्याबाबतची परवानगी देणारा अध्यादेश आयुष मंत्रालयाच्या भारतीय वैद्यक परिषदेने (काऊन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन) काढला आहे. आयुर्वेदिक डॉक्टरांनी या निर्णयाचे स्वागत केले, तर आधुनिक वैद्यकशास्त्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘आयएमए’ आणि ‘एमएमसी’ या संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आयुर्वेदातील पदव्युत्तर पदवी असलेल्या शल्य (सर्जरी) आणि शालाक्य (ईएनटी-ऑफ्थॅल्मॉजी) या विद्याशाखांबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात आयुष डॉक्टर सक्षमीकरण समितीचे सदस्य डॉ. मंदार रानडे म्हणाले, सर्व आयुर्वेदिक डॉक्टरांच्या वतीने या अध्यादेशाचे मी स्वागत करतो. आतापर्यंत अभ्यासक्रमाचा भाग म्हणून आम्हाला शस्त्रक्रिया करण्याचे ज्ञान होते, मात्र त्या करताना केंद्र सरकारच्या कायद्यांमध्ये त्यासाठीची सुस्पष्ट परवानगी नसल्यामुळे सतत टांगती तलवार होती. या अध्यादेशामुळे ती टांगती तलवार दूर झाली आहे.

यापूर्वी १९७५, १९९६, २००४ आणि २०१६ मध्येही अशा प्रकारचे अध्यादेश काढण्यात आले होते, मात्र त्यानंतरच्या काळात त्यामध्ये खंड पडला. आता या अध्यादेशामुळे दिल्ली, हरियाणा, अलाहाबाद आणि मुंबई उच्च न्यायालयांमध्ये सुरू असलेल्या दाव्यांमध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांची बाजू बळकट होणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक आयुर्वेदिक डॉक्टर कार्यरत आहेत, त्यांच्या मदतीने खेडय़ापाडय़ांतील गोरगरिबांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे आता जास्त सुकर होईल, तसेच भविष्यात विद्यार्थ्यांनाही आयुर्वेदिक शिक्षणाकडे वळावेसे वाटेल, असेही डॉ. रानडे यांनी सांगितले.

‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, आयुर्वेदातून पदवी घेतलेल्या डॉक्टरांसाठी पदव्युत्तर शिक्षण घेताना निश्चित केलेला अभ्यासक्रम स्वतंत्र असणे अपेक्षित आहे. मात्र, मॉडर्न मेडिसिनचाच अभ्यासक्रम ठेवण्यास नॅशनल मेडिकल कमिशनने परवानगी दिली असेल, तर ती बाब दुर्दैवाची आहे. ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चा या अध्यादेशाला विरोध आहे. रुग्णांचा संभ्रम टाळण्यासाठी पदव्युत्तर पदवी घेतलेल्या आयुर्वेदिक डॉक्टरांची पदवी एम. डी. किं वा एम. एस. ही नसावी, पदवीतून त्यांची आयुर्वेदाची पार्श्वभूमी स्पष्ट व्हावी, अशी मागणीही ‘आयएमए’ने केली आहे.

महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलचे प्रमुख डॉ. शिवकु मार उत्तुरे म्हणाले, एमडी आणि एमएस या पदव्या आधुनिक वैद्यकशास्त्राचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे आयुर्वेदातील परिभाषेवर आधारित पदव्युत्तर पदवीचा स्पष्ट उलेख असेल, अशी पदवी या डॉक्टरांसाठी असावी. महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलमध्ये नोंदणी करणाऱ्या आधुनिक वैद्यकशास्त्राच्या डॉक्टरांसाठी आम्ही पदवीचा स्पष्ट उल्लेख करण्याबाबत आग्रही आहोत, त्यामुळे आयुर्वेदाबाबतही सरकारचे तेच धोरण असावे.

३९ प्रकारच्या शस्त्रक्रियांना परवानगी 

आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रियेची परवानगी देण्याबाबतची अधिसूचना भारतीय वैद्यक परिषदेने जारी केली आहे. आयुष मंत्रालयाने आता भारतीय उपचार पद्धतींना महत्त्व देण्याचे ठरवले असून एकूण ३९ प्रकारच्या शस्त्रक्रिया आयुर्वेदात पदव्युत्तर पदवी असलेले डॉक्टर करू शकतील. डोळे, कान, नाक, घसा यातील किमान १९ शस्त्रक्रियांचा त्यात समावेश आहे. त्यासाठी इंडियन मेडिसिन काऊन्सिल (पदव्युत्तर आयुर्वेद शिक्षण) नियम २०१६ या कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे.

या शस्त्रक्रियांना मुभा 

* डोळे, कान, नाक, घशाशी संबंधित किमान १९ शस्त्रक्रिया

* शरीरात गेलेला धातूचा आणि बिगरधातूचा तुकडा काढणे

* साध्या गाठी (लिपोमा, फायब्रोमा) काढणे

* गँगरीन झालेला अवयव काढणे. तिरळेपणाची शस्त्रक्रिया

* पोटात गेलेला अपायकारक पदार्थ काढणे. मोतीबिंदू शस्त्रक्रिया

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2020 12:06 am

Web Title: ayurvedic doctors allow surgery abn 97
Next Stories
1 करोनाच्या संकटातही लोणावळा, खंडाळा परिसरात पर्यटकांची गर्दी
2 शरद पवारांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण; म्हणाले…
3 जगतगुरु संत तुकोबांचे देहूतील मंदिरही राहणार बंद
Just Now!
X