सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बीएस्सीच्या (संगणकशास्त्र)  तृतीय वर्षांच्या ऑबजेक्ट ओरिएन्टेड सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग विषयाची प्रश्नपत्रिका फुटली. शनिवारी दुपारी परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा-पंधरा मिनिटे आधीच मोबाइलमध्ये आली. ३ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवर येत असल्याचे प्रकार होत असून, विद्यापीठाकडून मात्र प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचा दावा करण्यात आला.

बीएस्सीच्या संगणकशास्त्र अभ्यासक्रमातील द्वितीय आणि तृतीय वर्षांची परीक्षा ३ ऑक्टोबरपासून सुरू झाली. द्वितीय वर्षांच्या सत्र एक आणि दोनची परीक्षा दुपारी दहा ते बारा, तृतीय वर्षांच्या सत्र तीन आणि चारची परीक्षा दुपारी दोन ते चार या वेळेत पुणे, नाशिक, नगर जिल्ह्य़ांतील विविध केंद्रांवर सुरू आहे.

द्वितीय वर्षांच्या प्रश्नपत्रिका सुरू होण्यापूर्वी सव्वानऊच्या सुमारास, तर तृतीय वर्षांच्या प्रश्नपत्रिका दुपारी सव्वाच्या सुमारास परीक्षा केंद्रावरून व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मिळू लागल्या. बुधवारी इंटरनेट प्रोग्रॅमिंग आणि शुक्रवारी प्रोग्रॅमिंग इन जावा या तृतीय वर्षांच्या प्रश्नपत्रिकाही अशाच पद्धतीने फुटल्या. शनिवारीही तृतीय वर्षांच्या ऑब्जेक्ट ओरिएन्टेड सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग या विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी दहा-पंधरा मिनिटे मोबाइलमध्ये मिळाल्याचे विद्यार्थ्यांची सांगितले.

विद्यापीठाची कोणतीही प्रश्नपत्रिका फुटलेली नाही. विद्यापीठाकडून महाविद्यालयाला ई-मेलद्वारे प्रश्नपत्रिका पाठवली जाते. त्यानंतर महाविद्यालयाकडून ती डाऊनलोड करण्यात येते. डाऊनलोड होण्याची वेळ आणि संबंधित महाविद्यालयाचा त्यावर वॉटरमार्क उमटतो. विद्यापीठाच्या माहितीनुसार कोणतीही प्रश्नपत्रिका फुटलेली नाही, तशी तक्रारही आलेली नाही, असा दावा विद्यापीठ प्रशासनाने केला.

चौकशीची मागणी

प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार रोखण्यासाठी विद्यापीठ प्रशासन आणि परीक्षा व मूल्यमापन विभागाने केलेल्या उपाययोजना पूर्णत अयशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे या प्रकारांची दखल घेऊन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का, असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली.