फग्र्युसन महाविद्यालयामध्ये यावर्षीपासून बी.व्होक (बॅचलर ऑफ व्होकेशनल सायन्स) ही पदवी सुरू करण्यात येणार असून ‘मीडिया कम्युनिकेशन प्रोग्रॅम’ आणि ‘डिजिटल आर्ट अँड अॅनिमेशन’ या विषयांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने यावर्षीपासून ‘बी.व्होक’ या पदवीला मान्यता दिली आहे. फग्र्युसन महाविद्यालयात यावर्षीपासून ‘मीडिया कम्युनिकेशन प्रोग्रॅम’ आणि ‘डिजिटल आर्ट अँड अॅनिमेशन’ या दोन विषयांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी पन्नास विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
तीन वर्षांच्या या अभ्यासक्रमात पहिले वर्ष उत्तीर्ण झाल्यावर पदविका (डिप्लोमा) प्रमाणपत्र, दुसऱ्या वर्षांनंतर ‘अॅडव्हान्स डिप्लोमा’ आणि तिसऱ्या वर्षांनंतर पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही वर्षी अभ्यासक्रम सोडला तरी त्यांचे नुकसान होणार नाही. मीडिया कम्युनिकेशन प्रोग्रॅम या अभ्यासक्रमात फोटोग्राफी, ऑडिओ प्रॉडक्शन, व्हिडीओ प्रॉडक्शन या क्षेत्रातील व्यावसायिक प्रशिक्षण मिळणार आहे. ‘डिजिटल आर्ट अँड अॅनिमेशन’ या अभ्यासक्रमात व्हिज्युअल डिझाईन, ग्राफिक्स, डिजिटल आर्ट, अॅनिमेशन आणि थ्रिडी तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.