दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून २२ डिसेंबरला मुंबईत मोर्चा काढला जाणार आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राजू शेट्टी यांनी ही माहिती दिली. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढावदेखील यावेळी उपस्थित होते. त्यांनी या मोर्चाला पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी बाबा आढाव यांनी देखील सरकारला थेट इशारा देताना आणीबाणी सदृश्य भय लादण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं आहे.

आम्ही आणीबाणीचा अनुभव घेतला आहे. जर या सरकाराच्या डोक्यात असेल की, आणीबाणी सदृश्य भय लादण्याचा प्रयत्न करू असे वाटत असेल तर हे सरकाराच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांमध्ये बाबा आढाव यांनी पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर निशाणा साधला. असं झाल्यास देशात वेगळेच वातावरण निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. हा धोक्याचा इशारा असेल हे सरकारने लक्षात ठेवावे, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

मी ७० वर्ष चळवळीमध्ये असून सरकार साधे बोलण्यास तयार नाही. यामुळे आमच्या अडचणीमध्ये वाढ होत आहे. यामुळे अनेक प्रश्न निर्माण होणार आहे. हे सरकारने लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे, असंही बाबा आढावा म्हणाले. दोष केवळ जुन्या कायद्यांचा आहे का, त्या कायद्याच्या अपुरेपणाचा आणि तुमच्या नाकर्तेपणाचा आहे. असा सवाल उपस्थित करीत आढावा यांनी सरकारवर त्यांनी निशाणा साधला. तसेच पुढे बोलताना आढाव यांनी, देशभरात अनेक तज्ञ मंडळी आहे. मात्र त्यांच्यासोबत आजवर कोणत्याही प्रकारची चर्चा केली नाही. दिल्लीमध्ये बोलावा ना, आम्ही चर्चेसाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

याच पत्रकार परिषदेमध्ये राजू शेट्टी यांनी २२ डिसेंबर रोजी मुंबईमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती दिली. “आंदोलनाची दखल केंद्र सरकार घेत नाही. तसंच ज्या अंबानी आणि अदानी यांच्यासाठी कृषी विधेयक आणले आहे, त्यांच्या निषेधार्थ २२ डिसेंबरला मुंबईतील उपजिल्हाधिकारी कार्यालय ते बीकेसीमधील अंबानी इस्टेटवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मोर्चा काढला जाणार,” असं राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे.