News Flash

पं. बबनराव हळदणकर यांचे निधन

गेल्या काही वर्षांपासून पं. हळदणकर पुण्यामध्ये वास्तव्यास होते.

आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि अनेक शिष्यांना घडविणारे गुरू पं. बबनराव हळदणकर (वय ८९) यांचे शुक्रवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. पं. हळदणकर यांच्या पार्थिवावर रविवारी (२० नोव्हेंबर) वैकुंठ स्मशानभूमी येथे सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून पं. हळदणकर पुण्यामध्ये वास्तव्यास होते. आग्रा घराण्याची तालीम देण्यासाठी त्यांनी नुकतेच गुरुकुल सुरू केले होते. औंध (जि. सातारा) येथील संगीतमहोत्सवात आणि त्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी शिष्यांनी केलेल्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमात पं. बबनराव हळदणकर यांचे गायन झाले होते. हीच त्यांची अखेरची मैफल ठरली.

श्रीकृष्ण सावळाराम हळदणकर हे मूळ नाव असले तरी संगीतक्षेत्रात ते पं. बबनराव या नावानेच परिचित झाले. वडील सावळाराम हे जागतिक दर्जाचे चित्रकार होते. मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्र विषयात बी. एस्सी. (टेक) ही पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी रसायन उद्योगात संशोधन आणि विकास अधिकारी म्हणून काम केले. १९५० ते १९५५ या काळात त्यांनी गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांच्याकडे तालीम घेतली. पुढे आग्रा घराण्याचे उस्ताद खादिम हुसेन खाँ यांच्याकडे १९६० ते १९७५ अशी १५ वर्षे त्यांनी नियमितपणे घराणेदार तालीम घेतली. अनवट राग, वैविध्यपूर्ण बंदिशी, बोलबनाव, ख्याल, ठुमरी, धमार अशा विविध शैलींची तालीम त्यांना मिळाली.

लडिवाळ बोलबनाव, लयकारी आणि तिहाईवरील प्रभुत्व, रागांची अनोखी मांडणी आणि अनवट रागांमधील सहज संचार ही त्यांच्या गायकीची वैशिष्टय़े होती. ‘रसपिया’ या नावाने त्यांनी अनेक आकर्षक बंदिशी बांधल्या आहेत.  आग्रा आणि जयपूर गायकीच्या सौंदर्यतत्त्वांची चर्चा करणाऱ्या पं. बबनराव हळदणकर यांच्या ‘जुळू पाहणारे दोन तंबोरे’ या पुस्तकास राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला. ‘घराण्यांची वाटचाल’ हे अन्य घराण्यांची चर्चा करणारे पुस्तकही त्यांनी संपादित केले होते.

गोवा कला अकादमी येथे १९८२ मध्ये संचालकपदावर काम करताना देशभरातील विद्वानांना पाचारण करून ५४ रागांचे स्वरूप निश्चित करणारा ‘रागों का प्रमाणीकरण’ हा प्रकल्प त्यांनी यशस्वीपणे पार पाडला. आकाशवाणीचे ‘अ’ श्रेणीचे कलाकार असलेल्या बबनराव यांच्या भारतासह युरोप आणि अमेरिकेमध्ये संगीत मैफली झाल्या होत्या.

पुणे भारत गायन समाजाचा माणिक वर्मा पुरस्कार, डॉ. प्रभा अत्रे पुरस्कार आणि संगीत लेखनासाठीचा काका हाथरसी पुरस्कार यांसह महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.

अल्पचरित्र

  • पं. बबनराव या नावाने परिचित
  • रसायनशास्त्र विषयात

बी. एस्सी. (टेक) पदवी संपादन

  • १९५० ते १९५५ या काळात गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांच्याकडे तालीम
  • आग्रा घराण्याचे उस्ताद खादिम हुसेन खाँ यांच्याकडे १९६० ते १९७५ अशी १५ वर्षे नियमितपणे घराणेदार तालीम
  • लयकारी आणि तिहाईवरील प्रभुत्व, रागांची अनोखी मांडणी ही त्यांच्या गायकीची वैशिष्टय़े
  • डॉ. प्रभा अत्रे पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी गौरव

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 2:07 am

Web Title: babanrao haldankar passes away
Next Stories
1 डाळिंब उत्पादक शेतकरी हवालदिल
2 शुल्क वाढले, शिष्यवृत्तीची रक्कम मात्र तेवढीच
3 फाशीची शिक्षा सुनावलेल्या कैद्याची येरवडा कारागृहात आत्महत्या
Just Now!
X