शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची खंत

दैनंदिन जीवनातील प्रश्नांनी हताश झालेल्यांसाठी गड-किल्ले प्रेरणास्त्रोत ठरू शकतात. मात्र पुतळे उभारण्याची स्पर्धा आणि पुतळ्याच्या उंचीवरून भांडणे करण्यातच आपण समाधान मानतो, अशी खंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी रविवारी व्यक्त केली. युवा पिढीत राष्ट्रीय चारित्र्याचे बीजारोपण करण्यात आपण कमी पडलो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

बुकमार्क पब्लिकेशन्सतर्फे डॉ. सचिन विद्याधर जोशी यांच्या ‘दुर्गसंवर्धन’ या पुस्तकाचे प्रकाशन पुरंदरे यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते. राज्याच्या पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, प्रकाशक पराग पिंपळे, वर्षां पिंपळे या वेळी उपस्थित होत्या.

पुरंदरे म्हणाले,‘ छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर त्यांच्या मृत्यूनंतर स्वराज्यासाठी लढलेल्या मावळ्यांच्या पराक्रमाच्या इतिहासाचे वाचन आणि सखोल अभ्यास करणे सयुक्तिक ठरेल. त्यावरून शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा आपल्याला प्रत्यय येईल.’

गर्गे म्हणाले,‘ महाराष्ट्र शासनाने गेल्या पाच वर्षांत गड-किल्लय़ांच्या संवर्धनासाठी ११३ कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यापैकी ६५ कोटी रूपयांची कामे पुरातत्त्व विभागाने पूर्ण केली आहेत. या माध्यमातून मराठवाडय़ातील अनेक किल्लय़ांना नवसंजीवनी देण्यात आली. गडसंवर्धन समितीने लोकसहभागाला महत्त्व देत या कामाला योग्य दिशा दिली आहे. पर्यटकांसाठी गड-किल्लय़ांवर स्वच्छतागृहे बांधण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे.’