सातारच्या राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले, तंजावरचे युवराज प्रतापसिंह भोसले, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे, श्रीमंत सत्यशील राजे दाभाडे आदी राजघराण्यांतील मान्यवरांकडून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. शिवकाळाचे यथार्थ चित्रण समाजापुढे आणणाऱ्या शिवशाहिरांचा उशिरा का होईना यथोचित सन्मान होत असल्याबद्दल या सर्वानी समाधान व्यक्त केले.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना नुकताच महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च असा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेक मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. यामध्ये या ऐतिहासिक घराण्यातील मान्यवरांकडूनही शिवशाहिरांचे नुकतेच प्रत्यक्ष भेटून अभिनंदन करण्यात आले. आयुष्यभर शिवकाळाचा वेध घेत त्याचे समाजाला दर्शन घडविण्याचे काम शिवशाहिरांनी केल्याचे मत या मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आले आहे. राजघराण्यातील या मान्यवरांशिवाय केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते, गृहराज्यमंत्री राम शिंदे, बेळगावचे महापौर किरण सायनाक, महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार संभाजीराव पाटील, सांगलीच्या शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे गुरुजी, शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे, क्षत्रिय मराठा समाजाचे डॉ. नरेंद्र महाडिक आदी मान्यवरांनी त्यांचे प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही दूरध्वनीवरून शिवशाहिरांचे अभिनंदन केले.