नवजात अर्भकाचा मृत्यू; वॉर्डबॉय विरोधात गुन्हा दाखल
पुणे : वडगाव शेरी भागातील एका खासगी रुग्णालयातील वॉर्डबॉयने डॉक्टर असल्याचे सांगून गर्भवती महिलेला उपचार केले. त्यानंतर अतिरक्तस्राव झाल्याने महिलेला दुसऱ्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिला प्रसूत झाली पण नवजात अर्भकाचा मृत्यू झाला. डॉक्टर असल्याची बतावणी करणाऱ्या संबंधित वॉर्डबॉय विरोधात महिलेच्या पतीने तक्रार दिली. या प्रकरणात वॉर्डबॉय विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
हरी शंकर ठाकूर (वय ३६, रा. वडगाव शेरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वॉर्डबॉयचे नाव आहे. पतीने याबाबत चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची पत्नी एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. ती आठ महिन्यांची गर्भवती होती. महिलेच्या पोटात अचानक दुखू लागल्याने तिला तातडीने मध्यरात्री वडगाव शेरी भागातील अनुप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी ठाकूरने डॉक्टर असल्याची बतावणी करून महिलेवर उपचार सुरू केले. अतिरक्तस्राव झाल्याने महिलेला तातडीने तेथून हलविण्याचा निर्णय पतीने घेतला आणि मध्यरात्री महिलेला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना महिला प्रसूत झाली. मात्र, नवजात अर्भकाचा मृत्यू झाला.
ठाकूरने डॉक्टर असल्याची बतावणी करून चुकीचे उपचार केल्याने नवजात अर्भकाचा मृत्यू झाला, असे महिलेच्या पतीने फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर तपास करत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 10, 2019 12:54 am