खासगी नोकरदार, गृहिणी, तरुण व उद्योजकांच्या तुलनेत सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रमाण पाच टक्के

ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांमध्ये तरुण, गृहिणी, उद्योजक, खासगी क्षेत्रातील नोकरदारांच्या तुलनेत सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रमाण फारच कमी असल्याचे एका पाहणीतून समोर आले आहे. ऑनलाइन खरेदी करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रमाण केवळ ५.२ टक्के असल्याचे आढळून आले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत प्रा. सतीश आठवले यांनी ऑनलाइन खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या संदर्भातील संशोधन नुकतेच पूर्ण केले. त्यांना विद्यापीठातील पुम्बाच्या प्रा. डॉ. सुरभी जैन यांनी मार्गदर्शन केले. या संशोधनात त्यांनी ग्राहकांचा कल, त्यांच्या आवडीनिवडी, ऑनलाइन खरेदीवर होणारा खर्च या अनुषंगाने अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी विविध स्तरांतील ग्राहकांशी संवाद साधला.

सुमारे ५०० ते २ हजारांच्या उत्पन्न गटातील तरुण त्यांचे ७० टक्के उत्पन्न ऑनलाइन खरेदीवर खर्च करतात. तर ११.७ टक्के महिला, ९.५ टक्के उद्योजक आणि ९.८ टक्के खासगी क्षेत्रातील नोकरदार ऑनलाइन खरेदी करतात.

या तुलनेत सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रमाण बरेच कमी असल्याचे दिसून आले.

जेमतेम ५.२ टक्के सरकारी कर्मचारी ऑनलाइन खरेदी करतात. जवळपास ४० टक्के ग्राहक ५०० ते २ हजारांदरम्यानची खरेदी दरमहा ऑनलाइन करतात. केवळ ४.१ टक्के ग्राहकच दर महिन्याला १० हजार किंवा त्याहून जास्त खर्च ऑनलाइन खरेदीवर करत असल्याचे आणि ६१ टक्के तरुण ऑनलाइन खरेदीलाच प्राधान्य देत असल्याचे या पाहणीदरम्यान आढळून आले.

महत्त्वपूर्ण निष्कर्ष

* ७२ टक्के ग्राहकांना ऑनलाइन खरेदी करताना सुरक्षितता वाटते

* २८ टक्के ग्राहक ऑनलाइन खरेदी करताना अस्वस्थ असतात

* ३४ टक्के ग्राहक ऑनलाइन खरेदीवेळी निष्काळजी असतात

*६५ टक्के ग्राहक काळजीपूर्वक खरेदी करतात

* २७.३ टक्के ग्राहकांना क्रेडिट कार्डची माहिती देताना भीती वाटते

* २४.५ टक्के ग्राहकांना ऑनलाइन खरेदीत धोका असल्याचे मान्य

* निर्धारित वेळेपेक्षा वस्तू घरी येण्यात जास्त वेळ जात असल्याचे २१.७ टक्के ग्राहकांचे म्हणणे

भारतात ग्राहकांच्या डेमोग्राफिक प्रोफाइलद्वारेच माहितीचे संकलन केले जाते. मात्र, या संशोधनात सायकोग्राफिक निकषांचा वापर करून संशोधन करण्यात आले. या विषयात विविध संकेतस्थळांनी अधिक सखोल अभ्यास केल्यास ग्राहकांची मनोवस्था त्यांना अधिक नेमकेपणाने समजण्यास मदत होईल. या विषयाच्या संशोधनासंदर्भात अनेक शक्यता आजमावून पाहता येऊ शकतात.

– प्रा. सतीश आठवले, संशोधक