‘बजाज ऑटो’ कंपनीच्या चाकण येथील प्रकल्पातील कामगारांचे आंदोलन मंगळवारी पंधराव्या दिवशीही सुरूच राहिले.
‘महाराष्ट्र लेबर युनियन’चे अध्यक्ष राजन नायर आणि ‘अल्फा लावल (शिरवळ) युनियन’चे रवी धाडवे यांच्यासह इतर कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनीही आंदोलनास भेट दिली. नायर आणि धाडवे यांनी आंदोलनाला अनुक्रमे पंचवीस हजार आणि अकरा हजार रुपयांची मदत जाहीर केली. ‘श्रमिक एकता महासंघा’चे अध्यक्ष किशोर ढोकळे, सरसचिव केशव घोळवे, मारुती भापकर, विश्वकल्याण कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार या वेळी उपस्थित होते.
हा लढा शांततेच्या मार्गाने सुरू ठेवण्याचे आवाहन नायर यांनी कामगारांना केले. कंपनीच्या कामगारांनी एक रुपयास एक याप्रमाणे पाचशे समभाग द्यावेत अशी मागणी केली आहे. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे या समभागांची किंमत सुमारे नऊ ते दहा लाख रुपये होते. या मागणीवर टीका केली जात असली, तरी ही मागणी ‘एम्प्लॉयी शेअर्स स्टॉक अॅक्शन प्लॅन’ या संकल्पनेवर आधारित असल्याची माहिती केशव घोळवे यांनी दिली.