अवघ्या पंधरा दिवसांत मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान पेलण्यासाठी प्रचारसाहित्यामध्ये राजकीय पक्षांच्या झेंडय़ाचा समावेश असलेली बाजीराव पगडी उमेदवार आणि कार्यकर्त्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. उमेदवारांसह संबंधित प्रभागाच्या प्रचार फेरीमध्ये सहभागी होणाऱ्या पक्षनेत्यांसाठी या पगडय़ा खरेदी करण्याकडे कल दिसून येत असून, या पगडीची मागणी वाढली आहे. खर्चाची मर्यादा वाढवल्यामुळे उमेदवार सढळ हाताने बॅचेस, झेंडे, पक्ष चिन्हाचे कटआऊट, उपरणे, टोप्या, फेटे, पगडी अशा प्रचारसाहित्याची खरेदी करीत आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. अर्ज माघारीची मुदत संपल्यामुळे चार सदस्यांचा समावेश असलेल्या प्रत्येक प्रभागातील उमेदवारांच्या लढतीचे अंतिम चित्रदेखील स्पष्ट झाले आहे. यापूर्वी प्रत्येक उमेदवारासाठी कमाल मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत होती. मात्र, यामध्ये दुप्पट वाढ करण्यात आली असून, प्रत्येक उमेदवाराला दहा लाख रुपयांपर्यंत खर्च करता येणार आहे. त्यामुळे प्रचारसाहित्य खरेदीमध्ये यापूर्वी घेतला जाणारा आखडता हात आता उमेदवारांना सैल करता येणार आहे. उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून सर्व प्रकारच्या प्रचारसाहित्याची मागणी वाढत असल्याची माहिती ‘मुरुडकर झेंडेवाले’चे गिरीश मुरुडकर यांनी दिली.

‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटासाठी पगडय़ा बनविण्याचे काम आम्ही केले होते. हे ध्यानात घेऊन यंदाच्या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांच्या झेंडय़ाचा आणि निवडणूक चिन्हाचा समावेश करून राजकीय बाजीराव पगडी घडविली आहे. शिवसेनेची पगडी भगव्या रंगाची, तर भाजपची पगडी भगव्या आणि हिरव्या रंगाची आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे या पक्षांची पगडी पांढऱ्या रंगाची आहे. या पगडय़ांचा काठ पक्षाच्या ध्वजाचा असून, पगडीच्या मध्यभागी पक्ष चिन्हाचे प्रतीक आहे. या पगडीची किंमत दीड हजार रुपये असून त्यावरील सजावट हवी तशी करून घ्यावयाची असेल, तर त्याचा वेगळा दर आकारला जातो. या पगडीबरोबरच उपरणे देखील आहे. त्यामुळे पगडी आणि उपरणे परिधान केलेला उमेदवार आणि पक्षनेते प्रचार फेरीमध्ये सर्वाचे लक्ष वेधून घेतील. या पगडीबरोबरच पारंपरिक फेटय़ांनाही मागणी आहे, असे मुरुडकर यांनी सांगितले.प्लास्टिक, पत्र्याचे आणि धातूपासून बनविलेल्या पक्षाच्या निवडणूक चिन्हाचे बॅचेस आहेत. त्याच्या जोडीला यंदा वेगवेगळय़ा पक्षचिन्हांचा समावेश असलेल्या खडय़ांच्या बॅचेसना मागणी आहे. त्याची किंमत अगदी दोन रुपयांपासून आहे. खडय़ांचा बॅच शंभर रुपयांना आहे. वेगवेगळय़ा आकारांतील झेंडे अगदी थोडय़ा नगांपासून ते शेकडय़ांमध्येही उपलब्ध आहेत. मोठय़ा आकाराचा मेगा झेंडा साडेतीन हजार रुपयांना आहे. गळय़ात घालण्यासाठी साधी उपरणी दहा ते वीस रुपयांमध्ये असून शाही उपरणे तीनशे रुपयांना आहे. हेच सारे प्रचारसाहित्य अपक्ष उमेदवारांसाठीही तयार ठेवले आहे. आमच्याकडे पक्षपातळीवर खरेदी होत असली तरी मतदारांना आकृष्ट करून घेताना चांगल्या प्रतीचे साहित्य शोभून दिसावे यासाठी उमेदवार स्वतंत्ररीत्या खरेदी करतात, असेही मुरुडकर यांनी सांगितले.