पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची वादग्रस्त ठरलेली बदली सातच दिवसात रद्द करण्यात आली असून ते यापुढे पूर्वीप्रमाणेच अतिरिक्त आयुक्त म्हणून महापालिकेत काम पाहतील. राज्य शासनाने बकोरिया यांची क्रीडा व युवक कल्याण विभागाचे आयुक्त या पदावर बदली केली होती. मात्र या बदलीला शहरात तीव्र विरोध झाला होता.
पुणे महापालिकेत नियुक्ती झाल्यापासून वर्षांच्या आतच बकोरिया यांची बदली करण्यात आली होती. तसा आदेश गेल्या मंगळवारी शासनाने काढला होता. मात्र, बकोरिया यांच्या बदलीला शहरात जोरदार विरोध झाला. स्वयंसेवी संस्थांनी बदली रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. तसेच काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बदलीच्या विरोधात महापालिकेत आंदोलनही केले. बकोरिया यांनी अतिशय कमी कालावधीत महापालिकेतील ठेकेदारांच्या अनेक गैरप्रकारांची चौकशी करून ते उघड केले होते. तसेच काही प्रलंबित प्रकल्पही त्यांनी मार्गी लावले होते. इतरही काही गैरप्रकारांच्या चौकशीचे काम त्यांच्याकडे सुरू आहे. अशा कार्यक्षम व अल्पावधीत चांगली कामे करून दाखवणाऱ्या अधिकाऱ्याची बदली करू नये, अशी मागणी होती.
बदलीला विरोध झाल्यानंतर शासनाने दुसऱ्याच दिवशी बकोरिया यांच्याकडे क्रीडा आयुक्त हे पद राहील व या पदाबरोबरच महपालिकेचे अतिरिक्त आयुक्त या पदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे राहील असा आदेश काढला. त्यानंतर मंगळवारी शासनाने बकोरिया यांच्याकडे महापालिकेचे ‘अतिरिक्त आयुक्त’ हे पद राहील अशा स्वरुपाचा आदेश काढला आहे.