17 July 2019

News Flash

‘बालगंधर्व’ पाडणार

नव्या वर्षांत बालगंधर्व रंगमंदिर पाडले जाणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात बहुमानाचे स्थान असलेली आणि सुवर्ण महोत्सव पूर्ण केलेली बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू पाडून तिथे सर्व सुविधांनी युक्त असे बहुमजली रंगमंदिर संकुल उभारण्याच्या दृष्टीने महापालिकेकडून आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचे आराखडे महापालिकेने वास्तुविशारदांकडून मागविले आहेत. त्यामुळे नव्या वर्षांत बालगंधर्व रंगमंदिर पाडले जाणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

कलाकार, रंगकर्मी, तंत्रज्ञ आणि प्रेक्षकांच्या सोयीचा विचार करून ज्यांनी बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू साकारली ते महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षांतच महापालिकेने या पुनर्विकासाच्या प्रक्रियेला प्रारंभ केला असून बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाला तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या चालू वर्षीच्या अंदाजपत्रकात शहरातील सांस्कृतिक चळवळीला प्रोत्साहन देण्याबरोबरच कलादालने-नाटय़गृहांच्या नूतनीकरणावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करण्याचे निश्चित करण्यात आले होते. बालगंधर्व रंगमंदिराची सध्याची वास्तू पाडून तेथे सुसज्ज नवी इमारत बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात १० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. त्याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने २८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केले होते. महापालिकेने आता प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केल्यामुळे बालगंधर्व रंगमंदिर पाडले जाणार, ही गोष्ट अधोरेखित झाली आहे.

बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करण्याचे निश्चित करून त्याबाबतच्या प्रत्यक्ष कार्यवाहीला महापालिकेकडून सुरूवात करण्यात आली आहे. पुनर्विकासाचे प्रस्ताव सादर करू इच्छिणाऱ्या वास्तुविशारदांनी १० ते २४ डिसेंबर या कालावधीत नोंदणी करावी, असे महापालिकेच्या भवन रचना विभागाकडून जाहीर करण्यात आले असून पुनर्विकासाचे आराखडे सादर करण्यासाठी २१ जानेवारी २०१९ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

शहराचे वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचे भूमिपूजन ८ ऑक्टोबर १९६२ रोजी बालगंधर्व यांच्या हस्ते झाले. त्यानंतर २६ जून १९६८ रोजी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते रंगमंदिराचे उद्घाटन झाले. महापालिकेच्या वतीने रंगमंदिराचे नूतनीकरणही काही वर्षांपूर्वी करण्यात आले होते.

First Published on December 7, 2018 1:39 am

Web Title: bal gandharva ranga mandir