कुंचल्याची जबरदस्त शक्ती सामान्य माणसाच्या हितासाठी वापरणारे.. आणीबाणीनंतर देशाला कणखर आणि शक्तिशाली नेतृत्व हवे यासाठी इंदिरा गांधी यांना पाठिंबा देणारे.. व्यंगचित्रकलेच्या ताकदीवर पक्ष उभा करून महाराष्ट्राला अस्मिता प्रदान करणारे.. राजकीय पाश्र्वभूमी नसलेल्या सामान्य कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाला उभारी देत नेतृत्व घडविणारे.. राजकारणात कठोर शब्दांनी टीका करणारे, पण वैयक्तिक जीवनात मैत्रीचा ओलावाही जपणारे.. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे असे विविध पैलू उलगडले माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी.
पुणे महापालिकेतर्फे साकारण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलादालनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्ताने पवार यांना भावलेले बाळासाहेब उपस्थितांना ऐकायला मिळाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महापौर प्रशांत जगताप, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, श्रीरंग बारणे, संजय राऊत, वंदना चव्हाण, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, माजी मंत्री शशिकांत सुतार, ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, उपमहापौर मुकारी अलगुडे, सभागृहनेता शंकर केमसे, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, शिवसेनेचे गटनेता अशोक हरणावळ, स्मिता वस्ते या वेळी उपस्थित होते.
बाळासाहेब हे राष्ट्रीय नेते होते, पण त्यापेक्षाही अधिक ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यंगचित्रकार होते, अशा शब्दांत गौरव करून पवार म्हणाले,‘‘शंभर अग्रलेखांपेक्षाही प्रभावी असलेल्या व्यंगचित्र या माध्यमाची ताकद त्यांनी जाणली होती. माझ्याशी बोलताना ते डेव्हीड लो यांचे उदाहरण देत असत. लो यांच्या चित्रांना हिटलरही वचकून असायचे. बाळासाहेबांनी माझ्यावरही चित्रं काढली. त्याकाळी माझे वाढलेले शारीरिक वजन त्यांनी महाराष्ट्राला दाखविले. हातचं राखून एकमेकांच्या विरोधात बोलण्याचे सोडले नाही. प्रसंगी कठोर शब्दांमध्ये आम्ही टीका करीत असलो तरी वैयक्तिक जीवनामध्ये बाळासाहेबांनी आणि मीनाताईंनी प्रेमाचा ओलावा कायम जपला. आम्ही उभयता त्यांच्याकडे जात असू.’’
शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या पहिल्या मेळाव्यात बाळासाहेब बोलायला उभे राहिले आणि त्यांच्या विचारांनी स्फुल्लिंग चेतविले, या आठवणी सांगून पवार म्हणाले,‘‘आणीबाणीनंतर देशाला कणखर नेतृत्वाची गरज आहे हे ध्यानात घेऊन त्यांनी इंदिरा गांधी यांना पाठिंबा दिला होता. स्वत:च्या पक्षावर या निर्णयाचा विपरीत परिणाम होईल याची पर्वा न करता त्यांनी राज्यात काँग्रेसविरोधात शिवसेनेचा एकही उमेदवार उभा केला नाही. औरंगाबाद मतदारसंघात बुरुड समाजाची ५०० मतेही नसताना चंद्रकांत खैरे या सामान्य कार्यकर्त्यांला त्यांनी सत्तेमध्ये नेऊन बसविले. सामान्यांच्या कर्तृत्वाला उभारी देत नेतृत्वाची फळी उभारणारे नेते हे त्यांचे योगदान कदापिही विसरता येणार नाही.’’
‘‘बाळासाहेबांचा जन्म पुण्यात झाला आणि त्यांच्या नावाचे कलादालनही पुण्यात सुरू झाले, याचा आनंद व्यक्त करून उद्धव ठाकरे म्हणाले, बाळासाहेबांच्या आयुष्यात गुपित असे काहीच नव्हते. एका व्यंगचित्रकाराने इतिहास घडविल्याचे हे जगातील एकमेव उदाहरण असेल. त्यांनी जागविलेला महाराष्ट्राचा स्वाभिमान कधी विसरणार नाही. महाराष्ट्राचे नाव घ्यायचे आणि दिल्लीश्वरांपुढे झुकायचे हे चालणार नाही.’’

सुप्रियाच्या राज्यसभा प्रवेशाचे श्रेय बाळासाहेबांचेच
राष्ट्रवादीने राज्यसभेच्या जागेसाठी सुप्रिया हिची उमेदवारी जाहीर केली. तिचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर बाळासाहेबांचा मला दूरध्वनी आला. ‘शरदबाबू, सुप्रिया उभी राहतेय?’, असा प्रश्न त्यांनी मला विचारताच मी ‘तुमचा उमेदवार कोण’ असे त्यांना विचारले. तेव्हा बाळासाहेब माझ्यावर भडकले. ‘आमच्या अंगाखांद्यावर खेळलेली पोरगी राज्यसभेत जात असताना मी उमेदवार उभा कसा करणार; ती बिनविरोधच गेली पाहिजे’, असे त्यांनी मला सांगितले. ‘पण, तुमच्या मित्रांचे काय’, असे मी विचारताच, ‘तुम्ही कमळीची काळजी करू नका’, असे केवळ सांगून बाळासाहेब थांबले नाहीत तर, त्यांनी कोणती कळ दाबली माहीत नाही, पण सुप्रिया बिनविरोध निवडून गेली. तिच्या राज्यसभा प्रवेशाचे शंभर टक्के श्रेय बाळासाहेबांचेच आहे,’’ अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.