राज्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना राज्य शासनाकडून मदती संदर्भात आज विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे २६ मागण्या केल्या आहेत. तातडीच्या आणि दीर्घकालिन अशा दोन्ही वर्गवारीत त्यांनी या मागण्या केल्या आहेत. शिवाय, आम्ही जेवढी मदत केली तेवढी देणार का? असा मुद्दा उपस्थित केला गेला आहे. त्यावर राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

”हे वर्ष नैसर्गिक संकटाच होतं. या अगोदर देखील कोकण आणि कोल्हापूर येथे महापूर आल्याने नागरिकांचे खूप नुकसान झाले आहे. त्या घटना लक्षात घेता, आमचं सरकार सर्व मदत करीत असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, २६ कलमी काम मला माहिती नाही. फडणवीस यांनी त्यांच्या काळात किती मदत दिली, ते बघावं लागेल. तुम्ही मुद्दाम तपासून पाहा, त्यांनी म्हटलं म्हणून विश्वास कशाला ठेवता. ते येणार होते आले नाही.” असा टोला बाळासाहेब थोरात यांनी यावेळी लगावला.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात डिजीटल स्वाक्षरीत फेरफार वितरण, सुधारित नमुन्यातील सातबारा वितरण, ई-मिळकत पत्रिका ऑनलाईन फेरफार प्रणाली दस्त नोंदणी प्रक्रियेशी संलग्न या कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यानंतर प्रसार माध्यमाशी त्यांनी संवाद साधला यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे देखील दिली.

यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की,” हे वर्ष तसं नैसर्गिक संकटाचं गेलं. करोनाचं संकट तर एका बाजूला होतंच. आपल्या राज्यासह संपूर्ण जग कठीण परिस्थितीला सामोरं गेलं आहे. कोकणात दोनदा चक्रीवादळं आली, त्यानंतर पुन्हा आता अतिवृष्टीचं संकट आलं. कोल्हापूर, सांगली या विभागात पुन्हा पुराचा फटका आपल्याला बसला आहे. मागील वर्षी जर पाहिलं तर चक्रीवादळानंतर आम्ही चांगल्या पद्धतीने मदत केली. एवढच नाही तर प्रत्येक चक्रावादळानंतर आठ दिवसात संपूर्ण जनजीवन सुरळीत करून दिलं, हे लक्षात घेतलं पाहिजे.”

महाराष्ट्रावरचं जलसंकट: फडणवीसांच्या ठाकरे सरकारकडे २६ मागण्या

तसेच, ”एका बाजूला करोनाच्या तिसऱ्या लाटेचा जो धोका आहे आणि आजच्या माध्यमांच्या हेडलाईन पाहिल्या तर काळजी वाटते अशी स्थिती आपली आहे. अनेक देशांमध्ये तर हे संकट लसीकरण झाल्यावरही पुन्हा सुरू झाल्याचं आपल्याला दिसत आहे. देशपातळीवर देखील आपलं कौतुक झालं, काही गोष्टी तर जागतिक पातळीपर्यंत गेल्या, कारण आपण अगोदरपासून काळजी घेत आलेलो आहोत. मुख्यमंत्र्यांचा एक शब्द कायम होता, की नेहमी आपण पारदर्शकता ठेवू, काय असेल ते लोकांना सांगू. कटू असतील ते निर्णय आपण घेवू. त्याचा परिणाम महाराष्ट्रात आपण ही परिस्थिती बऱ्यापैकी हाताळली हे सगळ्यांनी मान्य केलेलं आहे, ही वस्तूस्थिती आहे. आज तिसऱ्या लाटेचा धोका आहे असं म्हटलं जात असेल तर, सगळ्यात महत्वाची बाब असते ती म्हणजे नागरिकांच आरोग्य आणि त्यांचं जीवन, जीवीतहानी होऊ नये याची काळजी घेणं, पहिलं कर्तव्य हे आहे. बाकी काहीपण दुरूस्त करता येईल, पण ते नाही दुरूस्त करता येत. म्हणून त्यावर लक्ष केंद्रीत करून, कसं जनजीवन सुरळीत करता येईल. याचा विचार आपल्यालाच करावा लागणार आहे. कारण, थोडीशी सूट दिलेली दिसली की लग्नकार्य किती मोठ्याप्रमाणात होतात, हे काय वेगळं सांगायची आवश्यकता नाही.” असं थोरात यांनी बोलून दाखवलं.

म्हणून काही निर्बंध आम्हाला घालावे लागतात –

याचबरोबर, ”आम्ही तर म्हणतो माझे कुटुंब माझी जबाबदारी, म्हणजे माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे. मी लोकांमध्ये फिरून घरात जाणार आहे. म्हणून काही बदल झाला का? किती बदल झाला? शेवटी एका बाजूला शासन आहे, जे नागरिकांची काळजी घेतं. नागरिकांनी देखील स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. म्हणून काही निर्बंध आम्हाला घालावे लागतात, त्याचा फार आनंद असतो असं नाही. परंतु ते नागरिकांच्या हितासाठी करावं लागतं. याबाबत टास्कफोर्ससोबत मुख्यमंत्री चर्चा करणार होते. जे काही निर्णय असतील ते योग्य पद्धतीने जाहीर केले जातील. काही जिल्ह्यांमध्ये रूग्ण संख्या पुन्हा वाढण्यास सुरूवात झाली. माझ्या जिल्ह्यात ३०० पर्यंत आम्ही खाली आलो होतो, आज संख्या १३०० झाली आहे. काय करायचं हा प्रश्न लगेच पडतो. शेवटी या सगळ्या गोष्टींची काळजी आम्हाला आहे.” असं थोरात यांनी यावेळी बोलून दाखवलं.

सातबारा आता नवीन फॉरमॅटमध्ये मिळणार –

बाळासाहेब थोरात म्हणाले की, सर्व सातबारा डिजिटल पद्धतीने मिळत होता. तो आता नवीन फॉरमॅटमध्ये मिळेल. सातबारा डिजिटल करणं सोपं नव्हतं,आता एका क्लिकवर सर्व फेरफार मिळणार आहे. सर्व नागरिकांना हे सहज उपलब्ध होणार आहे. यामुळे त्यांच्या वेळेत बचत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विमा कवच आणि पीक विमा नोंदी शेतकऱ्यांना आता स्वतः शेतकऱ्यांना मोबाईलवर करता येणार याचा लवकरच शुभारंभ मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार असल्याचे त्यांनी सांगितले.