News Flash

आघाडी शासनाच्या शिक्षणविषयक निर्णयांची गाथा सांगणाऱ्या पुस्तकाला मागणी, मात्र पुस्तकच बाजारातून गायब

बालभारतीने प्रकाशित केलेल्या ‘लोकशाही आघाडी शासनाचे शालेय शिक्षणविषयक महत्त्वाचे निर्णय’ या पुस्तकाला सध्या निवडणुकीच्या तोंडावर भलतीच मागणी आहे.

| March 27, 2014 03:19 am

बालभारतीने प्रकाशित केलेल्या ‘लोकशाही आघाडी शासनाचे शालेय शिक्षणविषयक महत्त्वाचे निर्णय’ या पुस्तकाला सध्या निवडणुकीच्या तोंडावर भलतीच मागणी आहे. या पुस्तकाची बालभारतीकडूनच जाहिरात करण्यात येत असली तरी प्रत्यक्षात मात्र हे पुस्तक बाजारातून गायब झाले आहे. बालभारतीच्या डेपोमध्ये हे पुस्तक नसल्याच्या उत्तरामुळे प्रचारासाठी उत्सुक असलेल्या कार्यकर्त्यांच्या पदरी निराशा आली आहे.
बालभारती म्हणजेच महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून ‘लोकशाही आघाडी शासनाचे शालेय शिक्षणविषयक महत्त्वाचे निर्णय’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. बालभारतीने काही दिवाळी अंकांमध्ये आपल्या प्रकाशनांच्या केलेल्या जाहिरातींमध्ये या पुस्तकाचा उल्लेख करण्यात आला आहे. या पुस्तकाची वीस रुपये किंमत आहे. एवढय़ा कमी किमतीमध्ये आयतेच उपलब्ध होणारे प्रचारसाहित्य पाहता, निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर कार्यकर्त्यांची पावले या पुस्तकासाठी आपसूकच पुस्तकांच्या दुकानाकडे वळली. मात्र, हे पुस्तक उपलब्ध नसल्याचे उत्तर पुस्तक विक्रेत्यांकडून देण्यात आले. बाजारात पुस्तक मिळत नाही म्हटल्यावर हाती जाहिरात घेऊन कार्यकर्त्यांची पावले बालभारतीच्या डेपोकडे वळली. मात्र, हे पुस्तक डेपोमध्ये उपलब्ध नसल्याचे बालभारतीमधून सांगण्यात आले. आपणच जाहिरात केलेले हे पुस्तक ‘आम्ही तयारच केले नाही,’ असेही उत्तर बालभारतीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या पदरी निराशा तर आलीच, पण त्यापेक्षाही बालभारतीनेच केलेली जाहिरात खरी की अधिकाऱ्यांचे म्हणणे खरे, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला.
बालभारतीने आपल्या पाठय़ेतर प्रकाशनांची जाहिरात २०१३ मधील काही दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीमध्ये आदर्श शिक्षकांची आत्मचरित्रे, छत्रपती शिवाजीमहाराज स्मृतिग्रंथ, बालभारती उत्तम संस्कार कथा, शारीरिक शिक्षण शालेय मार्गदर्शिका, विविध भाषांचे शब्दकोश अशा अभ्यासक्रम पूरक पुस्तकांबरोबरच ‘लोकशाही आघाडी शासनाचे शालेय शिक्षणविषयक महत्त्वाचे निर्णय’ या पुस्तकाचाही उल्लेख या जाहिरातीमध्ये करण्यात आला आहे. ही पुस्तके मिळण्यासाठी बालभारतीच्या विभागीय भांडारांचे संपर्क क्रमांकही देण्यात आले आहेत. मात्र, या भांडारांमधून हे पुस्तक उपलब्ध करून देण्यास नकार येतो आहे. बालभारतीने प्रकाशित केलेल्या पुस्तकांवर शैक्षणिक संस्था, जिल्हा परिषदा, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांना पुस्तकाच्या किमतीवर २० टक्के आणि शैक्षणिक आणि शासकीय संस्थांना ३० टक्के सवलत देण्यात येते. मात्र, सध्या भलताच भाव खाणाऱ्या या पुस्तकावर मात्र कोणतीही सवलत (वटाव) देण्यात येणार नसल्याचे जाहिरातीत उल्लेख आहे. कोणतीही सवलत नसताना या पुस्तकाला मात्र भलतीच मागणी दिसत आहे.
 
खासगी साहित्याचे प्रकाशन बालभारतीकडून कसे?
नियमानुसार बालभारतीने पाठय़पुस्तके किंवा अभ्यासपूरक साहित्याची निर्मिती आणि प्रकाशन करणे आवश्यक आहे. मात्र, तरीही लोकशाही आघाडी शासनाने घेतलेल्या निर्णयांची गाथा बालभारतीने कशी काय प्रकाशित केली? बालभारतीमधील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे पुस्तक जर बालभारतीने प्रकाशित केले नाही, तर उघडपणे त्याची जाहिरात बालभारतीने प्रसिद्धीस कशी दिली? जाहिरात प्रसिद्ध करूनही हे पुस्तक वितरणासाठी भांडारांमध्ये उपलब्ध का नाही? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 3:19 am

Web Title: balbharati published book on decesions of upa regarding school education
Next Stories
1 हिंदूुराष्ट्राच्या संरक्षण आणि प्रगतीच्या दृष्टीचा अभाव – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे मत
2 माहितीपटातून उलगडणार ‘मसाप’ची वाटचाल
3 मेंदी काढण्याची विश्वविक्रमाला गवसणी
Just Now!
X