राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व संशोधन संस्था अर्थात ‘बालभारती’च्या सुमारे ४० कोटी रुपयांच्या कागदखरेदी गैरव्यवहार प्रकरणाचा पाठपुरावा घेण्यासाठी मनसेचे आमदार नितीन भोसले यांनी शनिवारी या संस्थेला भेट दिली. त्यांनी तेथील पुस्तके व कागदांचे नमुने ताब्यात घेतले असून, हे नमुने तपासणीसाठी सरकारमान्य प्रयोगशाळेत देण्यात येणार आहेत. ‘कागद आणि पुस्तकात वापरलेला कागद यात सकृतदर्शनी तफावत पाहायला मिळत आहे,’ असे भोसले यांनी सांगितले.
बालभारतीतर्फे पुस्तकांच्या निर्मितीसाठी मोठय़ा प्रमाणात कागद खरेदी केला जातो. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सुमारे ४० हजार टन कागदाची खरेदी करण्यात आली. ते बाजारभावापेक्षा चढय़ा भावाने खरेदी करण्यात आले होते. याबाबत ‘लोकसत्ता’ला कागदपत्रे मिळाली होती. याशिवाय कागदाचे बाजारभाव आणि इतर खर्च यांची प्रत्यक्ष चौकशी केली होती. त्यावरून या व्यवहारात बालभारतीला सुमारे ४० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे दाखवून दिले होते. यावरून आमदार भोसले यांनी विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी भोसले शनिवारी बालभारतीत आले. त्यांनी संचालक चंद्रमणी बोरकर यांची भेट घेतली व विविध विभागांची पाहणी केली. त्यांनी कागदाचे तसेच छापून आलेल्या पुस्तकांचे नमुने घेतले.
याबाबत भोसले यांनी सांगितले, की ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार आपण हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानुसार बालभारतीला भेट दिली. येथे निविदेद्वारे मागवण्यात आलेला कागद आणि प्रत्यक्ष पुस्तकातील कागद यात तफावत असल्याचे सकृतदर्शनी पाहायला मिळत आहे. हे नमुने तपासणीसाठी आपण सरकारमान्य प्रयोगशाळेत पाठवणार आहोत. कागदाची खरेदी करण्यासाठी बालभारतीत कोणताही तज्ज्ञ नसल्याचे पाहणीत लक्षात आले. या प्रकरणाचा आपण पाठपुरावा करणार आहोत.