विरोधकांच्या प्रश्नांना नेहमी लीलया टोला लगावणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आज पुण्यातील बालेवाडी येथे टेनिसचे बॉल टोलवले. आज पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी येथे शिवछत्रपती क्रीडा संकुलात टेनिस स्पर्धांचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी टेनिस खेळण्याऐवजी टेनिस बॉल प्रेक्षकांमध्ये टोलवत त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मुख्यमंत्र्यांनी प्रेक्षकांकडे टोलावलेल्या चेंडूचा झेल घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये एकच चढाओढ लागली होती. चार दिशेला बसलेल्या प्रेक्षकांकडे मुख्यमंत्र्यांनी अतिशय नेमकेपणाने टेनिसच्या बॉलचा टोला लगावला.
यावेळी उपस्थित असणारे स्पर्धक आणि प्रेक्षकही मुख्यमंत्र्यांच्या या फटकेबाजीने आश्चर्यचकीत झाले. मुख्यमंत्र्यांनी टोलवलेल्या टेनिस बॉलचा झेल घेण्यासाठी उपस्थितांमध्ये जोरदार दंगा सुरु होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पुण्याच्या महापौर मुक्त टिळक आदी उपस्थित होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 31, 2018 7:07 pm