महापालिका नाटय़गृहाच्या आरक्षण नियमांचे पालन करून ट्रस्टचा कार्यक्रम असल्यास सवलतीत पैसे भरलेले असतानाही ‘थोरामोठय़ांचे’ कार्यक्रम असल्यास अचानक तीन महिने आधी ठरलेला कार्यक्रम रद्द करण्याबाबतचा निरोप येऊ शकतो. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिर हे नेमके कोणाचे आणि कोणासाठी हा प्रश्न उपस्थित केला आहे सामाजिक कार्यकर्त्यां आणि ‘मिळून साऱ्या जणी’च्या संपादक विद्या बाळ यांनी.
‘मिळून साऱ्या जणी’च्या रौप्यमहोत्सवी वर्षांचा प्रारंभ ऑगस्ट २०१३ मध्ये झाला. त्यासाठी ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार आणि नर्मदा बचाओ आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर उपस्थित होत्या. त्या कार्यक्रमाच्या वेळी अजित पवारांची सभा असल्याचे ऐनवेळी सांगण्यात आले. तर, यंदा २ ऑगस्ट रोजी कवी नामदेव ढसाळ यांना समर्पित केलेल्या रौप्यमहोत्सवी सांगता कार्यक्रमास हिंदी भाषक कवी विष्णू खरे, प्रज्ञा दया पवार आणि सतीश काळसेकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, शरद पवारसाहेबांचा कार्यक्रम असल्याने तुमचा कार्यक्रम होऊ शकणार नाही, असा निरोप चार-पाच दिवस आधी देण्यात आला. हे दोन्ही दूरध्वनी अंकुश काकडे यांनीच केले होते. शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही तडजोडीचे सहकार्य केल्यानंतरच आमचे दोन्ही कार्यक्रम पार पडले, असे विद्या बाळ यांनी सांगितले.
यामध्ये शरद पवार किंवा अजित पवार यांच्यापैकी कोणालाही लक्ष्य करायचे नसून आपला रोख महापालिका व्यवस्थापनावर आहे. मात्र, हा अनुभव लागोपाठ दुसऱ्यांदा आल्याचे सांगून विद्या बाळ म्हणाल्या, पुणेकर जनतेसाठी उभारलेल्या नाटय़गृहांबाबत महापालिकेचे नेमके धोरण काय आहे. आरक्षित केलेली ही जागा ऐनवेळी काढून कशी घेता येते. थोरामोठय़ांच्या कार्यक्रमाला अगदी आयत्या वेळेला शाळा, महाविद्यालयाचे सभागृह किंवा अन्य खासगी जागा मिळू शकतील. पण, ज्यांनी भरपूर आधीपासून नियोजनपूर्वक जागा आरक्षित केली आहे त्यांच्या नियोजनाचा फज्जा उडविण्याचा अधिकार कुणालाही आणि का असावा? आयत्या वेळच्या बदलांबाबतचा नियम कोठेही नाही आणि त्याबाबतची सूचनाही फोनवरूनच मिळते. यामागचा खरा प्रकार काय आहे हे जाहीर होण्याची आणि कोणाचेही आरक्षण ‘अशा’ कार्यक्रमांसाठी रद्द होणार नाही याची खबरदारी यापुढे घेतली जाण्याची नितांत आवश्यकता आहे.