क्रमिक पुस्तकांव्यतिरिक्त इतर पुस्तके अभावानेच उपलब्ध होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दारात यंदाचे बालकुमार साहित्य संमेलन होणार आहे. २६ वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन मुळशीतील मारुंजी गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत करण्याचे ठरवण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील मुलांना साहित्याची गोडी लागावी यासाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या ‘ऊर्मी’ संस्थेचे सहकार्य या संमेलनास मिळाले आहे. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे प्रमुख कार्यवाह सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कार्याध्यक्ष नवीन इंदलकर, ‘ऊर्मी’ संस्थेचे राहुल शेंडे, रेश्मा शेंडे आणि पूनम पंडित या वेळी उपस्थित होते.
१४ आणि १५ फेब्रुवारीला होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांची निवड करण्यात आली आहे. लहान मुलांसाठी त्यांनी ‘गंमत झाली भारी’, ‘उजेडाचा गाव’, ‘रान फुले, ‘झाड आजोबा’, ‘खारुताई आणि सावलीबाई’, ‘हुर्रे हुप’ आदि पुस्तकांचे लेखन केले आहे.
मुळशी आणि मावळमधील एकूण ४० जिल्हा परिषदेच्या व अनुदानित मराठी शाळांना या संमेलनाची निमंत्रणे देण्यात आली असून संमेलनाच्या दोन्ही दिवशी मिळून दोन हजार विद्यार्थी उपस्थिती लावतील अशी अपेक्षा असल्याचे राहुल शेंडे म्हणाले. ‘मुळशीतील हा भाग पुणे शहरापासून फार दूर नसला तरी या ठिकाणच्या शाळांमध्ये क्रमिक पुस्तकांच्या व्यतिरिक्त शालेय विद्यार्थ्यांना वाचायला फारशी पुस्तके उपलब्ध होत नाहीत. रोजचे वर्तमानपत्रही अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही,’ असेही त्यांनी सांगितले.