अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होणार आहे. जूनअखेरीस संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा होण्याची शक्यता आहे.
डॉ. न. म. जोशी यांच्या अध्यक्षतेखालील बालकुमार साहित्य संस्थेच्या कार्यकारिणीची मुदत पाच महिन्यांपूर्वी संपुष्टात आली. त्यामुळे संस्थेच्या शनिवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये आगामी पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र, या बैठकीमध्ये संवाद पुणे संस्थेच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या रौप्यमहोत्सवी अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. संस्थेचे कार्याध्यक्ष नवीन इंदलकर, कार्यवाह सुनील महाजन आणि खजिनदार अनिल कुलकर्णी या वेळी उपस्थित होते. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आगामी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला. संस्थेचे सुमारे ७५० आजीव सभासद असून जूनअखेरीस पुण्यामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असल्याची माहिती सुनील महाजन यांनी दिली.
राज्य सरकारतर्फे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेला वार्षिक एक लाख रुपये अनुदान दिले जाते. राज्य साहित्य संस्कृती मंडळामार्फत हे अनुदान वितरित केले जाते. मात्र, यंदाच्या वर्षी अद्यापही संस्थेला अनुदान मिळालेले नाही. तरीही संस्थेतर्फे वर्षभरात करण्यात आलेल्या खर्चाचे हिशेब राज्य सरकारला सादर केल्यानंतरच वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात येणार असल्याचे सुनील महाजन यांनी सांगितले.