News Flash

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे पुनरुज्जीवन

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे पुनरुज्जीवन झाले असून ...

| October 3, 2015 03:20 am

बालकुमार साहित्य संमेलनांच्या आयोजनाबरोबरच बालवाङ्मय पुरस्कार देणाऱ्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे पुनरुज्जीवन झाले असून नवरात्रोत्सवामध्ये १८ ऑक्टोबर रोजी संस्था पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाचा श्रीगणेशा करणार आहे. संस्थेच्या घटनादुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे.
डॉ. वि. वि. घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने संस्थेच्या घटनेचे काम पूर्णत्वास नेले आहे. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन असे यापूर्वी असलेले संस्थेचे नाव बदलून अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था असे नामकरण करण्याचा प्रस्ताव धर्मादाय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे. १८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये या बदलासह घटना समितीने सुचविलेल्या दुरुस्त्यांना मान्यता घेण्यात येणार आहे. संस्था कार्यरत होत असताना सध्याची कार्यकारिणी कायम ठेवायची की नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करायची याबाबतचा निर्णय या सभेत घेण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे विद्यमान कार्यवाह सुनील महाजन यांनी दिली.
अमरेंद्र गाडगीळ यांनी १९७६ मध्ये अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन या नावाने संस्थेची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केली होती. सुधाकर प्रभू, श्यामला शिरोडकर, गजानन क्षीरसागर, दत्ता टोळ, दामोदर पाठक, रमेश मुधोळकर, म. वि. गोखले, लीला दीक्षित, श्रीधर राजगुरू आणि भालबा केळकर यांचा संस्थेच्या विश्वस्तांमध्ये समावेश होता. दोन तपानंतर विश्वस्तांच्या मान्यतेने अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था असे नामकरण करण्याचा ठराव संमत झाला. या संस्थेच्या नावामध्ये बदल केल्याचा अहवाल धर्मादाय आयुक्तांकडे पाठविण्यात आला. मात्र, नाव बदलाची ही प्रक्रिया पूर्ण झाली की नाही हे न पाहताच कामकाजास सुरुवात करण्यात आली. जुन्या संस्थेच्याच नोंदणी क्रमांकावर १५ वर्षे काम सुरू होते. दरम्यान, अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था या नावाला धर्मादाय आयुक्तांची मान्यताच नसल्याची धक्कादायक बाब विद्यमान पदाधिकाऱ्यांनीच उघडकीस आणली. या पाश्र्वभूमीवर झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये संस्था बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. संस्थेचे नव्याने कामकाज सुरू करण्यासाठी घटनेमध्ये बदल करण्याची आवश्यकता असून त्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्याचा निर्णयही या सभेत घेण्यात आला. त्या दृष्टीने सनदशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून १८ ऑक्टोबरपासून अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था अस्तित्वात येणार आहे.
बालकुमार संमेलनासाठी तीन ठिकाणहून निमंत्रणे
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था अस्तित्वामध्ये येत असल्याने अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन होणार यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. या संमेलनासाठी शेगाव, बारामती आणि महाबळेश्वर अशा तीन ठिकाणहून निमंत्रणे आली आहेत. संस्थेची घटनात्मक प्रक्रिया वेळेत आटोपली, तर फेब्रुवारीमध्ये संमेलन घेण्यात येणार आहे. या संमेलनासाठी दहा लाख रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी करणारा अर्ज राज्य सरकारकडे सादर केला असल्याचेही सुनील महाजन यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2015 3:20 am

Web Title: balkumar sahitya sanstha sammelan
टॅग : Sammelan
Next Stories
1 ‘क्रोशे’ची अनोखी दिनदर्शिका
2 पेट्रोल व डिझेलवरील एलबीटी रद्दचा पिंपरी पालिकेला २५ कोटींचा फटका
3 वीज व्यवस्था लोकसहभागापासून दूरच!
Just Now!
X