तरुणाने छेड काढून दिलेल्या त्रासाला कंटाळून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याच्या प्रकरणानंतर तळेगाव दाभाडे येथील नागरिकांकडून या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी दाखविलेल्या हालगर्जीपणाचाही निषेध म्हणून गुरुवारी नागरिकांनी बंद पाळला, तर राजकीय पक्षांनी एकत्र येऊन मोर्चा काढला. दरम्यान, या प्रकरणी बुधवारी अटक केलेला तरुण व त्याच्या आई-वडिलांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्याचप्रमाणे हलगर्जीपणाबाबत पोलीस निरीक्षकांसह तिघांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आकाश साळवी (वय १७, रा. तळेगाव दाभाडे) त्याचे वडील प्रकाश व आई मीना यांना पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. सृष्टी विजय दाभाडे (वय १६, रा. तळेगाव दाभाडे) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. आकाश हा वारंवार सृष्टीची छेड काढून तिला त्रास देत होता. याबाबत सृष्टीच्या नातेवाइकांनी पोलिसांकडेही तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी त्याची योग्य दखल घेतली गेली नाही. तरुणाच्या त्रासाला कंटाळून सृष्टीने १५ ऑक्टोबरला दुपारी पंचवटी कॉलनी येथील नगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीवरून उडी घेतली. नागरिकांनी तिला रुग्णालयात दाखल केले, मात्र तिचा मृत्यू झाला.
सृष्टीच्या आत्महत्येनंतर तळेगावातील नागरिकांकडून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही आक्षेप व्यक्त करण्यात आले. त्यानंतर बुधवारी रात्री पोलिसांनी आकाश व त्याच्या आई-वडिलांना अटक केली. गुरुवारी त्यांना वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. या प्रकरणी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्यासह संबंधित पोलीस हवालदार व शिपाई यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी बंद पाळून रोष व्यक्त केला. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांनी एकत्र येऊन मोर्चा काढला. नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, प्रक्षप्रपोद गणेश खांडगे, भाजपचे शहराध्यक्ष संतोष दाभाडे, विरोधी पक्षनेते गणेश भेगडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष यादवेंद्र कळदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुरेश चौधरी, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत सातकर, नगरसेवक चंद्रकांत कळदे, सुशील सैंदाने, शिवसेनेचे मुन्ना मोरे, सत्यंद्रराजे दाभाडे, युवती काँग्रेसच्या अर्चना मोरे आदींनी मोर्चात सहभाग घेतला. खासदार सुप्रिया सुळे यांनी सृष्टीच्या कुटुंबीयांची भेट घेतली.