गणेशोत्सवाच्या तयारीपासून शेवटच्या दिवसापर्यंत उत्सवाच्या यशस्वितेसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना, तसेच मिरवणुकीत आपल्या वादनाने ताजेपणा आणणाऱ्या बँड कलावंतांना आपल्या कामाचे श्रेय मिळावे यासाठी गणेश मंडळे व विविध संस्थांनी पुढाकार घेतला आहे.
अखिल मंडई मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शहरातील १११ गणेश मंडळांच्या १११ कार्यकर्त्यांना गौरवण्यात आले. अपर पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर यांच्या हस्ते या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात या वेळी उपस्थित होते.
‘‘अलीकडच्या काही वर्षांत उत्सवात काही दूषित प्रवाह मिसळत आहेत. कटुता टाळण्यासाठी अनुभवी कार्यकर्त्यांनी प्रशासनाशी सुसंवाद साधणे उपयुक्त ठरेल,’’ असे मत दैठणकर यांनी व्यक्त केले.
गेली ७५ वर्षे गणेश विसर्जन मिरवणुकीत वादन करणारे प्रभात बँडचे श्रीपाद आणि शेखर सोलापूरकर बंधू, तसेच या बँडमधील इतर वादक यांचा ‘वसंत द. पळशीकर स्मृती प्रतिष्ठान’तर्फे सत्कार करण्यात आला. आकाशवाणी पुणे केंद्राचे संचालक आनंद देशमुख यांच्या हस्ते हे सत्कार करण्यात आले. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, खजिनदार महेश सूर्यवंशी, प्रतिष्ठानचे चिटणीस विलास पळशीकर या वेळी उपस्थित होते.
प्रभात बँड हा केवळ व्यवसाय नसल्याची भावना सोलापूरकर बंधूंनी या वेळी व्यक्त केली. ‘बँड वादन कलेच्या जोपासनेची उज्ज्वल परंपरा असून ती जपण्याचा कसोशीने प्रयत्न करू,’ असे ते म्हणाले.