पुणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता आणि सभागृहनेता या पदावर शंकर ऊर्फ बंडू केमसे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना सभागृहनेता या पदावरील नियुक्तीचे पत्र महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सोमवारी दिले.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केमसे यांना पत्र दिल्यानंतर विरोधी पक्षनेता व काँग्रेसचे गटनेता अरविंद शिंदे, भारतीय जनता पक्षाचे गटनेता गणेश बीडकर, शिवसेनेचे गटनेता अशोक हरणावळ तसेच सुभाष जगताप यांनी केमसे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. गेली चार वर्षे सुभाष जगताप हे महापालिकेचे सभागृहनेता म्हणून काम पाहत होते. त्यांनी गेल्या आठवडय़ात राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या जागी केमसे यांची नियुक्ती करण्याचा राष्ट्रवादीने घेतला. माजी उपमहापौर दिलीप बराटे यांचे नाव या पदासाठी प्रथमपासून चर्चेत होते. तसेच केमसे यांच्यासह आणखीही काही नावांची चर्चा होती. त्यातील केमसे यांना आता संधी मिळाली आहे. बराटे आणि केमसे यांना महापालिकेतील महत्त्वाचे पद मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांच्यापैकी एकाचा विचार केला जाईल, असे सांगितले जात होते.
महापालिकेत सभागृहनेता म्हणून काम करताना कोणताही पक्षभेद न करता सर्वाना बरोबर घेऊन काम करीन, असे मनोगत केमसे यांनी त्यांच्या निवडीनंतर व्यक्त केले. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांला पक्षाच्या नेत्यांनी सभागृहनेता या एका मोठय़ा पदावर काम करण्याची संधी दिली आहे. मी निश्चितपणे चांगल्या प्रकारे काम करीन, असेही ते म्हणाले.