दिवाळीत घरोघरी तयार होणाऱ्या वैशिष्टय़पूर्ण फराळाची जागा ‘रेडिमेड फराळा’ने घेतल्यामुळे शहरातील शेकडो महिला, बचत गट आणि छोटय़ा-मोठय़ा उद्योजकांना तसेच केटर्सना या काळात चांगला व्यवसाय मिळत असल्याचा अनुभव आहे. दिवाळीबरोबरच वर्षभर फराळाचे पदार्थ उपलब्ध होत असल्यामुळे दिवाळीच्या फराळात बंगाली मिठाईने प्रवेश केला आहे.
दिवाळीचे वेध लागले की चकल्या, लाडू, करंज्या, चिवडा, शेव, शंकरपाळे, अनारसे आदी फराळाचे पदार्थ करण्याची धामधूम सुरू व्हायची. बदलत्या काळात मात्र पती-पत्नी नोकरीला जाणाऱ्या कुटुंबांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे दिवाळीचा फराळ घरी करण्याची प्रथा हळूहळू मंदावली असून दिवाळीपूर्वी दोन-तीन दिवस आधी रेडिमेड फराळ खरेदी करण्याचे प्रमाण पुण्यात दरवर्षी मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे तयार फराळाचे पदार्थ करून ते दिवाळीच्या काळात ओळखीच्या कुटुंबांना किंवा दुकानदारांना विकण्याचा व्यवसाय या काळात जोरात चालतो, असे चित्र आहे.
पुण्यात महापालिकेने स्थापन केलेल्या सुमारे शंभर गटांमधील किमान पाचशे महिला दिवाळी फराळ तयार करून विकतात. त्यांच्या फराळाची विक्री व्हावी, त्यांना चांगली बाजारपेठ मिळावी यासाठी महापालिकाही साहाय्य करते आणि महापालिकेतर्फे बचत बाजारही भरवले जातात. त्यामुळे या महिलांनी तयार केलेले लाडू, चिवडा, चकली आदी फराळांच्या पदार्थाना या बाजारांमध्ये चांगली मागणी राहते असा अनुभव असल्याचे महापालिकेचे समाज विकास अधिकारी हनुमंत नाझीरकर यांनी बुधवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. या गटांनी तयार केलेले फराळाचे पदार्थ दर्जेदार असल्यामुळे अनेक कंपन्यांकडूनही बचत गटांनी तयार केलेल्या फराळाला मागणी असते, अशीही माहिती नाझीरकर यांनी दिली.
बचत गटांबरोबरच शहरातील अनेक महिलाही दिवाळीपुरता हा व्यवसाय घरोघरी करतात आणि त्यांच्याकडील मागणीही दरवर्षी वाढत असल्याचा अनुभव आहे. विशेषत: घरगुती पद्धतीने तयार केलेल्या चकली, अनारसे अशा पदार्थाना तर मोठी मागणी असते.  तयार फराळ खरेदी करण्यालाच प्राधान्य दिले जात असल्यामुळे अनेक महिलांसाठी दिवाळी फराळ तयार करून त्याची विक्री हे व्यवसायाचे नवे दालन खुले झाले आहे. घरगुती पद्धतीने फराळ करण्याचा व्यवसाय जसा जोरात आहे तसाच केटर्सचाही व्यवसाय या काळात जोरात असतो. विशेषत: ज्यांच्याकडे खूप मोठय़ा प्रमाणात ऑर्डर्स असतात त्यांचे काम दिवाळीच्या आधी महिनाभर सुरू होते आणि दिवाळीच्या पहिल्या, दुसऱ्या दिवसापर्यंत हे काम चालते.

दिवाळी फराळात बंगाली मिठाई
दिवाळीचा दर्जेदार फराळ अनेक ठिकाणी वर्षभर उपलब्ध होत असल्यामुळे आता दिवाळीत फराळाची भेट देताना काही तरी नावीन्य हवे म्हणून फराळाबरोबरच बंगाली मिठाई देण्याची प्रथा नव्याने सुरू झाली आहे. दिवाळी फराळातील एखाद-दोन पदार्थ आणि त्याबरोबरच बंगाली मिठाई दिली जात असल्यामुळे दिवाळीत बंगाली मिठाईला मोठी मागणी राहते.