चिन्मय पाटणकर

बंगळुरुच्या मराठी युवा संघाच्या ‘युवांकिका २.०’मधील दोन एकांकिका आणि ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांचं ‘सदासर्वदा पूर्वापार’ हे नाटक पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.

बंगळुरुचा मराठी युवा संघ ‘युवांकिका २.०’ या संकल्पनेअंतर्गत एकांकिका घेऊन महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे. यात पुणे आणि कोल्हापूरमध्ये एकांकिकांचं सादरीकरण होणार आहे. त्यात शनिवारी (१३ एप्रिल) दुपारी १ ते ४ या वेळेत भरत नाटय़ मंदिर येथे ‘स्पंदन’ आणि ‘हाफ बॅचलर’ या एकांकिका सादर केल्या जाणार आहेत.

बंगळुरुमधील महाराष्ट्र मंडळ गेली ९९ र्वष मराठी संस्कृती, चालीरिती जपण्याचं काम करत आहे. महाराष्ट्र मंडळाच्या या प्रयत्नांना तरुणांकडूनही साथ मिळू लागली. त्यातूनच २४ वर्षांपूर्वी तरुणांनी एकत्र येत युवा मराठी संघाची स्थापना केली. गेल्या २४ वर्षांत युवा संघाने अनेक उपक्रम केले, ४५ एकांकिकाही सादर केल्या. स्वलिखित कविता, नाटिका, संगीत अशा विविध कला प्रकारांचा समावेश असलेला गोधडी हा कार्यक्रमही लोकप्रिय ठरला. तसंच ‘युवांकिका १.०’ या संकल्पनेअंतर्गत सादर करण्यात आलेल्या एकांकिकांचंही कौतुक झालं. त्यामुळे युवांकिका २.० महाराष्ट्रात सादर करण्याचा आग्रह झाला

‘युवांकिका २.०’मधील ‘स्पंदन’ ही प्रमोद खाडिलकर यांनी लिहिलेली एकांकिका सामाजिक प्रश्नावर आधारित असून, समाजातील एक विदारक सत्य मांडण्यात आलं आहे. तर हाफ बॅचलर ही निखळ विनोदी एकांकिका आहे. काहीही न करता हेडफोनच्या वायरचा जसा गुंता होतो, तसंच एखादी साधीशी गोष्ट किती किचकट होऊ शकते, याची गोष्ट या एकांकिकेत आहे. स्नेहा भुरके रांगणेकर यांनी ही एकांकिका लिहिली आहे.

नाटकाच्या शोधाचं रहस्यमय नाटक

डिटेक्टिव्ह कथा म्हटलं, की एखाद्या खुनाचा किंवा रहस्याचा शोध असंच आपल्या डोळ्यासमोर येतं. पण नाटककार आशुतोष पोतदार यांचे ‘सदासर्वदा पूर्वापार’ हे नाटक या समजाला अपवाद ठरतं. आपल्या ज्ञानपरंपरेचा शोध घेण्याचा एक वेगळा प्रयोग या नाटकात डिटेक्टिव्ह कथेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातर्फे ‘सदासर्वदा पूर्वापार’ हे नाटक रंगमंचावर येत आहे. या नाटकाचा प्रयोग १२ ते १४ एप्रिल दरम्यान नामदेव सभागृहात होणार आहे.

ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा भाग म्हणून पाहुण्या दिग्दर्शिका शर्मिष्ठा साहा यांनी हे नाटक दिग्दर्शित केलं आहे. रंगभूमीचा अभ्यास करणारे रफीक, नदी आणि रिया या तीन संशोधक इतिहासात गायब झालेल्या एका जुन्या नाटकाचा शोधात निघतात. कर्ण आणि द्रौपदी यांच्यावरच्या त्या नाटकाचं काय झालं, त्या कलाकारांचं काय झालं हे शोधण्याचा प्रयत्न करतात. या तिन्ही संशोधकांचे विचार वेगवेगळे आहेत. ते आपापल्या नजरेनं या हरवलेल्या नाटकाकडे, शोधाकडे पाहतात. त्यामुळे ते नाटकाबाबत काय विचार करतात, कसा शोध घेतात, त्या दरम्यान काय गुंता होतो हे नाटकात मांडण्यात आलं आहे.

‘ज्ञानपरंपरेचा शोध घेण्याचा, नाटकातून डिटेक्टिव्ह कथा मांडण्याचा एक प्रयत्न ‘सदासर्वदा पूर्वापार’ या नाटकात केला आहे. अनेक गोष्टी आपल्यासमोर येत नाहीत. काही वेळा त्या राजकारणामुळे लपवल्याही जातात. त्याचा शोध घेणं महत्त्वाचं का आहे, नाटकाच्या किंवा एकूण कलांच्या दस्तऐवजीकरणाविषयी असलेली अनास्था या विषयीचे प्रश्न हे नाटक उपस्थित करतं. आकृतिबंध म्हणूनही हे नाटक वेगळं आहे,’ असं नाटककार आशुतोष पोतदार यांनी सांगितलं.