इतिहासाचा केवळ एकदाच अभ्यास करणे उपयोगाचे नाही. तर, सातत्याने अभ्यास करून इतिहासाचे पुनर्लेखन झाले पाहिजे. देशाची फाळणी यासारख्या विषयाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचे मत माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांनंतरही देशाच्या फाळणीला जबाबदार कोण याची चर्चा देखील होत नाही याचा खेद वाटतो, असेही ते म्हणाले.
पुणे नगर वाचन मंदिरातर्फे माधव गोडबोले यांच्या हस्ते प्रा. शेषराव मोरे यांच्या ‘काँग्रेस आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला’ या पुस्तकाला श्री. ना. बनहट्टी पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष मा. शं. सोमण आणि कार्यवाह अरविंद रानडे या प्रसंगी उपस्थित होते.
माधव गोडबोले म्हणाले, ‘भारतातील सत्तेचे हस्तांतरण – १९४० ते १९४७’ या विषयावर ब्रिटिशांनी दहा खंडात्मक लेखन केले आहे. पाकिस्तानची निर्मिती हेच बॅ. जीनांच्या जीवनाचे ध्येय होते, असा निष्कर्ष त्यामध्ये नमूद आहे. त्यामुळे केवळ एका पुस्तकावर विश्वास ठेवून आपले मत बनवू नये. तर, इतिहासातील घटनांचा सर्व परिप्रेक्ष्यातून अभ्यास करणे आवश्यक आहे. फाळणीनंतरही असंख्य मुसलमान हिंदुस्थानात राहणार याची कल्पना असल्यामुळेच त्या वेळी द्विराष्ट्रवाद स्वीकारला गेला नाही. ही दूरदृष्टी असणाऱ्या नेतृत्वाविषयी आपण कृतज्ञ असले पाहिजे. आपल्या देशामध्ये अनेक स्मारक आहेत. पण, फाळणीदरम्यान जे अनेक लोक मारले गेले त्यांच्या नावाने स्मृतिस्तंभ देखील उभारला गेला नाही. इतिहासाचे विस्मरण असे क्वचितच आढळते. देश अखंड राहिला असता, तर राज्यघटना तरी होऊ शकली असती का आणि कोणत्या तऱ्हेची लोकशाही मान्य करणार होतो या प्रश्नांचा देखील वेध घेतला पाहिजे.
सध्या अस्तित्वात असलेल्या भारताचे अखंडत्व अबाधित ठेवण्यासाठीच काँग्रेस आणि गांधीजींनी अखंड भारत नाकारला हे वास्तव असल्याचे सांगून शेषराव मोरे यांनी देशाचे स्वातंत्र्य आणि फाळणीदरम्यानच्या इतिहासाचा धांडोळा आपल्या मनोगतातून घेतला. फाळणीनंतरचे हत्याकांड हा घटनेचा परिणाम दुर्दैवी होता. पण, अखंड भारतामध्ये कदाचित याहून अधिक लोक मारले गेले असते. काँग्रेसने लवकर फाळणी करून या हत्याकांडाचा कालावधी आणि तीव्रता कमी केली, असेही त्यांनी सांगितले.