रुपी सहकारी बँकेवर रिझव्र्ह बँकेने आर्थिक र्निबध लादल्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून आर्थिक अडचणीत सापडलेले ठेवीदार, खातेदार, सभासद आणि कर्मचारी यांना आपले मत नोंदवण्याची एक छोटीशी संधी समोर आली आहे. ‘रुपी’प्रश्नी ‘बँक एम्प्लॉइज युनियन’ने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांना बळकटी यावी, यासाठी सर्व खातेदार व ठेवीदारांनी एकत्र होऊन निवेदन द्यावे, असे आवाहन युनियनने केले आहे.  
रुपी बँकेचा परवाना रद्द होऊ नये, बँकेवर पूर्ण वेळ प्रशासक नेमावा, दोषी संचालक आणि अधिकारी वर्गावर फौजदारी कारवाई करून त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश द्यावेत, अशा मागण्या करणाऱ्या दोन याचिका बँक एम्प्लॉइज युनियनतर्फे मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. यातील एक याचिका फौजदारी व दुसरी दिवाणी स्वरूपाची आहे. या याचिकांबद्दल उच्च न्यायालयामार्फत रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया, सहकार खाते आणि प्रशासकांना नोटिसही बजावण्यात आल्या आहेत. ‘या याचिकांना बळकटी देण्यासाठी रुपी बँकेचे ठेवीदार आणि खातेदार यांनी निवेदन देण्यासाठी एकत्र यावे. बँकेवरील संकट टळण्यासाठी याचा उपयोग होईल,’ असे संघटनेने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
बँक एम्प्लॉइज युनियनशी संपर्क करण्यासाठी –
 युनियनने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांना पाठिंबा देण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी ठेवीदार व खातेदार पुढील दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क करू शकतील. हृषीकेश जळगावकर- ९६८९९२९७१७, किरण गुळुंबे- ९६८९९२९७२०, नरेश राऊत- ९६८९९२९७३५.
पत्रव्यवहारासाठीचा पत्ता- ‘संयुक्त सरचिटणीस बँक एम्प्लॉइज युनियन, पुणे ८६७, बुधवार पेठ, सोन्या मारुती चौक, अभ्युदय बँकेच्या वर’
संपर्काची वेळ- सायं. ५ ते ८
ई- मेल पत्ता – bnkemplunionpune@gmail.com