बँक्स फेडरेशनचे आवाहन

पुणे : शहरातील काही परिसर संपूर्णत: सील केल्यामुळे ज्या शाखांचे कामकाज सेवकांअभावी चालू ठेवणे अशक्य असेल, तेथील शाखेतील ग्राहकांना तात्पुरत्या कालावधीसाठी बँकेच्या नजीकच्या शाखांमधून सेवा घेण्याच्या सूचना द्याव्यात. सद्य:स्थितीत सर्व बँकांमधून सी.बी.एस. ची प्रणाली कार्यरत असल्याने ग्राहकांना कोणत्याही शाखांमधून व्यवहार करता येणे शक्य आहे. त्यानुसार बँकांनी नियोजन करावे, असे आवाहन दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर आणि पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष मोहिते यांनी मंगळवारी केले.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील काही पेठांचा परिसर सीलबंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या परिसरातील बँकांच्या शाखा व त्यामधून कार्यरत असणाऱ्या सेवकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व बँकांच्या व्यवस्थापनाला हे आवाहन करण्यात आले आहे.

शहरातील सील केलेल्या परिसरातील सेवकांना कामावर हजर राहण्यापासून सवलत द्यावी, बँकांमधून कार्यरत असणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांना काही काळापुरती सुट्टी देऊन बँकेतील कर्मचाऱ्यांनीच जमेल तेवढी स्वच्छता ठेवावी, बँकेचे सुरक्षारक्षक यांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था संबंधित शाखांमधूनच करावी, शाखांमधून कमीत कमी सेवक वर्ग ठेवून ग्राहकांना केवळ रोखीचे व्यवहारच करण्यासंबंधी आवाहन करावे, बँक कामकाजाच्या वेळा आवश्यकतेनुसारच ठेवाव्यात, असेही अनास्कर आणि मोहिते यांनी सांगितले.  बँकिंग सेवा अत्यावश्यक सेवेत येत असल्याने आपल्या ग्राहकांना सेवा देणे हे प्रत्येक बँकेचे कायदेशीर व व्यावसायिक कर्तव्य आहे. या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी करोनाच्या पार्श्वभूमीवर बँकांच्या व्यवस्थापनाने घेतलेल्या कोणत्याही आवश्यक निर्णयांमुळे रिझव्‍‌र्ह बँकेच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही हे पाहावे. बँकांनी कामकाजात केलेले बदल स्वत:च्या ग्राहकांना कळवावेत. बँकेच्या ग्राहकांनी एटीएमचा वापर करावा व गरजेपुरतेच शाखांमध्ये येण्याचे आवाहन एसएमएसद्वारे ग्राहकांना करावे. बँकेच्या सेवकांनी आपली जबाबदारी ओळखून त्यांना असलेल्या सवलतींचा गैरफायदा घेऊ नये, सामाजिक अंतर पाळावे. देशाच्या अर्थव्यवस्थेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बँकिंग क्षेत्रातील सेवकांसाठी व्यवस्थापनाने या विशिष्ट कालावधीकरिता सेवकांच्या आरोग्यासाठी आवश्यक रकमेचा विमा उतरवावा, असेही अनास्कर आणि मोहिते यांनी सांगितले.